
वाटीने पाणी भरण्याची वेळ
78312
किती दिवस वाटीने पाणी भरायचे?
महिलांचा सवाल; मंगळवार पेठेतील मंडलिक गल्लीतील चित्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : ये चला मोर्चा काढूया.. किती दिवस वाटीने पाणी भरायचे... एक महिला तर मुलीला घेऊन दुचाकीवरून थेट पाण्याच्या खजिन्याकडेच (पाणीपुरवठा कार्यालय) निघून गेली, कसे पाणी सोडत नाही ते बघतेच असे काही तर म्हणत होत्या. सकाळी मुलांचे डब्बे करायचे, घरातील आवरायचे की पाणीच भरायचे... मंगळवार पेठेतील मंडलिक गल्लीतील सकाळी सव्वासातच्या सुमारास पाणी भरणाऱ्या महिलांच्या या प्रतिक्रिया आहेत.
तब्बल महिना उलटला तरीही नळाला करंगळीच्या धारेनेही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जमिनीच्या उंचीपासून अवघ्या सहा ते आठ इंचावरील नळाखाली स्टिलचे भांडे ठेवून त्यातील पाणी वाटीने भरण्याचे काम महिला करतात. त्यामुळे त्यांचा राग अनावर होत आहे. अपेक्षित पाणीपुरवठा कायमच होत नसल्याच्या तक्रारी येथील नागरिकांच्या विशेष करून महिलांच्या आहेत. रोज सकाळी उठल्यावर पाणी भरणे म्हणजे मनस्ताप असल्याच्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
येथील महिलांना पाणी पाहिजे असल्यास थेट पाण्याच्या खजिन्यावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागतो. आज तर तेथेही कोणी अधिकारी भेटले नाहीत. प्रशासकांनी याची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महिलांनी केली. रतन निंबळकर, सुनीता फातले, शोभा महामुनी, सुनील भालकर, माधवी पेटकर, भाग्यश्री कोळी, सुमन डंबे, पूजा डंबे यांनी तर महापालिकेच्या नियोजावर टीका केली.
चौकट
काही ठिकाणी नळाची उंची कमी
मंडलिक गल्लीत काही ठिकाणी नळाची उंची खूपच कमी असल्यामुळे तेथे बादली खाली बसू शकत नाही. पर्यायाने पाईप लावून ते पाणी बादलीत घ्यावे लागत आहे. शहरातील प्रमुख भाग विशेष करून गावठाण, तरीही त्या ठिकाणी ही परिस्थिती आहे.