
भागमांडवलावरून सभासदांची नावे मतदार यादीतून वगळली
लोगो-
आजरा शेतकरी संघाची निवडणूक
भागभांडवलावरून सभासदांची
नावे मतदार यादीतून वगळली
---
चराटी-शिंपी गटाचा प्रसिद्धीपत्रकातून आरोप
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २५ : आजरा तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या २०२२-२७ च्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी सर्व वैयक्तिक सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली नसल्याचे समजते, असा आरोप प्रसिद्धीपत्रकातून चराटी-शिंपी गटाने सत्ताधाऱ्यांविरोधी केला. याबाबतचे पत्रक अनिकेत चराटी यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे, की आजरा तालुका संघ ही शेतकऱ्यांची संस्था आहे. गत वेळच्या निवडणुकीत या संस्थेत जवळजवळ नऊ ते दहा हजार वैयक्तिक सभासद होते. मागील निवडणुकीत त्या सर्व सभासदांची नावे मतदार यादीत नोंद होती व त्यांनी मतदानाचा अधिकार बजावलेला आहे.
विद्यमान संचालक मंडळाने सहकार कायद्यातील चुकीचा अर्थ काढून बेकायदेशीररीत्या एकतर्फी सभासद शुल्क १०० वरून ५०० रुपयांपर्यंत केले आहे. ते भरण्याबाबत कोणत्याही सभासदास लेखी सूचना दिलेली नाही. ठराविक वैयक्तिक सभासदांनी सभासद शुल्काची पूर्तता केलेली आहे. परंतु, बऱ्याच वैयक्तिक सभासदांना वाढीव शुल्क रकमेबाबत लेखी सूचना न मिळाल्याने त्यांनी सदरची रक्कम भरलेली नाही. त्या वैयक्तिक सभासदांची नावे मतदार यादीतून वगळलेली आहेत. त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा विद्यमान संचालक मंडळाचा मानस दिसतो. तालुका संघाकडे वैयक्तिक सभासद असणाऱ्या सर्व सभासदांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून सर्व वैयक्तिक सभासदांना मतदान करण्याचा अधिकार मिळण्याबाबतची लेखी तक्रार केली आहे. तसेच, श्री. रवळनाथ विविध कार्यकारी सहकारी (वि) सेवा संस्था- हत्तीवडे, अब्दुल हमीद सेवा संस्था- सावरवाडी, महात्मा फुले विकास सेवा संस्था- सुळे, हिंदमाता विकास सेवा संस्था- लाकूडवाडी या संस्थांचे बनावट ठराव दिले आहेत. पत्रकावर अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
------------
चौकट
आरोप तथ्यहीन : एम. के. देसाई
सर्व सभासदांना सभासद शुल्क वाढीवबाबत नोटिसा दिल्या होत्या. वार्षिक सभेला मंजुरी घेतली आहे. सहकार खात्याकडून वाढीव शुल्काबाबत मंजुरी घेतली. प्रारूप यादी अजून प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत, असे तालुका संघाचे अध्यक्ष एम. के. देसाई यांनी सांगितले.