
पंतप्रधान मोदींकडून रोनकच्या चित्राचे कौतुक
79282
पंतप्रधान मोदींकडून रोनकच्या चित्राचे कौतुक
इचलकरंजी, ता. ३१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये येथील रोनक व्यास याने काढलेल्या चित्राची निवड केली. ६ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या ऑनलाइन स्पर्धेमध्ये राज्यातून चार जणांच्या चित्राची निवड केली आहे. या विद्यार्थ्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक केले.
स्पर्धेत लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशभरातून केवळ २४ विद्यार्थ्यांच्या चित्राची निवड केली. महाराष्ट्रातून नागपूर, यवतमाळ, कुरुंदवाड व इचलकरंजीमधील केवळ चार विद्यार्थ्यांना यश मिळवता आले. रोनक हा इचलकरंजीतील यशोलक्ष्मीनगरमधील रहिवासी असून, याचे वडील सूत व्यापारी आहेत. तो संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये सातवीत शिकत आहे. त्याला चित्रकलेची आवड आहे. विजेत्यांचा सत्कार दिल्लीत पंतप्रधान निवास येथे झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते. निवडलेली रेखाचित्रे दिल्ली येथील बालभवनमध्ये प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.