उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा
उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा

उद्योग-व्यवसायाला अध्यात्माची जोड देत समाज घडवा

sakal_logo
By

79586

उद्योग-व्यवसायाला आध्यात्माची जोड द्या
---
श्री श्री रविशंकर; कोल्हापुरातील उद्योजक-व्यापाऱ्यांशी संवाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३१ ः अनेकांच्या हातांना काम देणारे व्यापारी, उद्योजक हे समाजव्यवस्थेचा एक मुख्य घटक आहे. समाजाच्या निर्मिती, प्रगतीत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. उद्योग-व्यवसायात अनेक आव्हाने येतात. त्यांचा सामना संयम आणि भक्कम मानसिकतेच्या जोरावर करा. उद्योग-व्यवसायाला आध्यात्माची जोड देत समाज घडविण्यासाठी योगदान द्या, असे आवाहन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज येथे केले.
येथील अयोध्या पार्कच्या सोसायटी हॉलमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक, गोशिमा, मॅक या औद्योगिक संघटनांतर्फे आयोजित ‘उद्योजक-व्यापारी संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री श्री रविशंकर म्हणाले, की जीवनात संतोष निर्माण करणे हा आध्यात्मिक ज्ञानाचा उद्देश आहे. जीवन जगण्यासाठी युक्ती, शक्ती, भक्ती, मुक्ती आवश्‍यक आहे. केवळ पैशांतून शक्ती आणि पुस्तक वाचून युक्ती (ज्ञान) मिळत नाही. त्यामुळे योग, साधना, सत्संग या त्रिसूत्रीने समाधानी आयुष्य जगा आणि इतरांना सुख द्या. बारा वर्षांनी महालक्ष्मीच्या कोल्हापूरनगरीत आल्याचा आनंद आहे. महालक्ष्मीचा आशीर्वाद आणि उद्योजक-व्यावसायिकांच्या कामगिरीने कोल्हापूर दरडोई उत्पन्नात पुन्हा देशात आघाडी घेईल.
आमदार जयश्री जाधव, ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांच्या हस्ते श्री श्री रविशंकर यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक हर्षद दलाल, दीपक पाटील, मोहन कुशिरे, दीपक चोरगे, दिनेश बुधले, सचिन मेनन, नितीन वाडीकर, सुनील कुलकर्णी, चेतन नरके, धैर्यशील पाटील, राजू पाटील, अतुल पाटील, मिलिंद धोंड, जयेश ओसवाल उपस्थित होते. सीमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक सुरेंद्र जैन यांनी आभार मानले.

चौकट
कर्मचाऱ्यांचे मन प्रसन्न ठेवा...
समाजात नैराश्‍य वाढत आहे. अशा स्थितीत ईश्‍वरकृपा आणि आत्मविश्‍वासासाठी ध्यानधारणा महत्त्वाची आहे. चिंता, काळजीतून काही नवनिर्मिती होत नाही. त्यामुळे स्वतःसह कर्मचाऱ्यांचे मन प्रसन्न ठेवण्यावर भर द्या. कर्मचाऱ्यांना प्रोत्‍साहन द्या. त्यांचा उत्साह वाढवा, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले.