रिपोर्ताज

रिपोर्ताज

Published on

९ फेब्रुवारी प्रसिद्धी

रिपोर्ताज
उदयसिंग पाटील

L80526, L80527

निरंतर सेवेची
‘धग’

पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचे असुविधांशी लढत जगणं

आता थोडा वेळ आहे असे वाटत असतानाच पाठोपाठ मृतदेह येऊ लागले. बाजूला पेटणाऱ्या चितेची धग तर जाणवत होतीच, पण त्याचा धूर नाकातोंडात जाताना बाजूची चिता रचण्यासाठी शेणी, लाकडे ठेवली जात होती. ‘त्यांचे’ हात लगबगीने काम करत होते. दहन दिले की तेथीलच चावीचे पाणी तोंडावर मारून पुढील चिता रचायला शेणीचे डालगे उचलले जात होते. परिसरातील सफाईला आणखी एकटा लागला होता. वातावरणात शांतता असली तरी त्यांच्या वाट्याला मात्र ती कधीच येत नाही. पण एकमेकांना साथ देत, एकमेकांच्या अडचणी दूर करत ते दररोजचा दिवस घालवतात. हे जगणं आहे पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचे...

...........................

प्रतीक्षा नाहीच...
‘जीवन कुठंही जगावं पण अंत्यसंस्कार पंचगंगा स्मशानभूमीतच व्हावेत’ ही शहरवासीयांची झालेली भावनाच या स्मशानभूमीचे महत्व अधोरेखित करते. मोफत अंत्यसंस्कार हे महत्वाचे असले तरी विधीला लागणारे जणू वातावरण तिथेच आहे असा अनेकांचा समज आहे. त्या समजातूनच शहरात इतर ठिकाणी महापालिकेने स्मशानभूमी बनवल्या असल्या तरी बहुतांशजण ‘पंचगंगे’वरच नेण्याचा आग्रह धरतात. त्याचा अनुभव सकाळीच आला. अकराची वेळ होती, शहराच्या दक्षिणेकडे असणाऱ्या प्रतिभानगरमधून व्यक्ती आली. पाठोपाठ मृतदेह येत आहे असे सांगून रवींद्र कांबळे यांच्याकडे पावती करू लागले. संबंधितांचे नाव, मृताचे नाव असे सारे कांबळे यांनी लिहून घेतले. तोपर्यंत इतर दोघे लाकडे, शेणी रचायला गेले. एकटा डालगे भरून शेणी आणत होता व दुसरा त्या लाकडावर रचत होता. अवघ्या पाच मिनिटात हे काम पूर्ण झाले. नातेवाईक मृतदेह घेऊन आले. त्यामुळे प्रतीक्षा हा प्रकारच नाही. सारा विधी पूर्ण होईपर्यंत बारा वाजत आले.

कमी-जादा काम नाही
दुसरीकडे कर्मचाऱ्यांची शिफ्ट बदलाची तयारी सुरू झाली. कांबळे यांनी त्या नातेवाईकांना पावतीवरील नाव पुन्हा एकदा तपासायला सांगितले, तसेच इंग्रजीतही लिहून घेतले. काही दान करायचे असल्यास दानपेटीत टाका किंवा पावतीही करू शकता, असेही सांगितले. तोपर्यंत इतर कर्मचाऱ्यांनी नळाला हात-पाय धुतले व पावतीच्या रुममध्ये जमले. नवीन टीमने कामकाज हातात घेतले. या शिफ्टकडून नैवद्य तसेच इतर सफाई प्रथम केली जाते. प्रत्येक शिफ्टला चार कर्मचारी. चांगले लिहिता येणारा पावती करतो व इतर अन्य कामाला लागतात. पावती करतो म्हणून त्याने खुर्चीत बसून रहायचे नाही. साऱ्यांनी मिळून लाकडे काढायची, आलेल्या शेणी रचायच्या, बेडवर लाकडे लावायची, मृतदेह आला तर पावती करून झाली की त्यानेही डालगे घ्यायचे शेणी, लाकडे नेण्यास मदत करायची. बेड उपलब्ध असल्यास किमान दहा बेडवर लाकडे रचली जातात. त्यामुळे माझ्या वेळेत मृतदेह आला नाही म्हणून त्यांना केवळ बसून राहता येत नाही. पुढील दहनांसाठी शेडमधून लाकडे काढायची. हे त्या कर्मचाऱ्यांच्या पातळीवर झालेले मॅनेजमेंट.

अन्य कर्मचारी यायला तयार नसतात...
कर्मचारी अशोक गवळी यांची १९८७ पासून येथेच नेमणूक आहे. त्यांना २०१९ ला अर्धांगवायूचा झटका आला, तरी बरे होऊन शेणी रचायला, लाकडे लावायला मदत करत होते. ही सेवा महत्त्वाची आहे असे सांगताना गवळी म्हणाले, ‘‘स्मशानभूमीसाठी दान करणाऱ्यांचे प्रमाण आता खूपच कमी झाले आहे. कुणी करायला जात असेल तर कशाला म्हणत दूर नेले जाते. पावती करणाऱ्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. दररोजच्या कामातून आम्हीच सारे एकमेकांना सुटी द्यायची, एखाद्याला अचानक काम लागले, आजारी पडला की बदलीला यायचे काम करतो.’’ एका खोलीचे कार्यालय आहे व कर्मचाऱ्यांना थांबायची सोयही तिथेच आहे. स्वच्छतागृहाची सोय नाही.

कायम करण्याची अपेक्षा
येथे काम करणारे तीन कायम कर्मचारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांची इतर ठिकाणी बदली झालेलीच नाही. या कर्मचाऱ्यांची बदली करायची म्हटली तर त्यांच्या जागी अन्य कुणी यायला तयार नसतात. त्यामुळे रोजगारासाठी या कर्मचाऱ्यांनीच मन तयार केले आहे. जुने कर्मचारी हाताखाली नवीन कर्मचारी तयार करतात. अशा अडचणीच्या ठिकाणी काम करणाऱ्यांना तरी रोजंदारीवर न ठेवता प्राधान्याने कायम करण्याची अपेक्षा आहे. इतरांच्या दुःखाचा भार हलका करणाऱ्यांच्या दुःखाचा भार हलका झाला पाहिजे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.