पशुखाद्यातील भेसळ जनावरांना त्रासदायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुखाद्यातील भेसळ जनावरांना त्रासदायक
पशुखाद्यातील भेसळ जनावरांना त्रासदायक

पशुखाद्यातील भेसळ जनावरांना त्रासदायक

sakal_logo
By

80731
-
पशुखाद्यातील भेसळ जनावरांच्या जीवावर
हरभरा कोळणा, कोंड्यात समुद्राची वाळू मिसळल्याच्या तक्रारी

सदानंद पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. ६ : जिल्‍ह्यात पशुधनाची संख्या वाढत आहे. शेतकरीही जनावरांना सकस चारा व पशुखाद्य देण्यासाठी प्रसंगी पोटाला चिमटा काढून हजारो रुपये खर्च करतात. मात्र, अतिरिक्‍त फायदा कमावण्याच्या नादात अनेक पशुखाद्य पुरवठा करणा‍ऱ्या कंपन्या भेसळयुक्‍त पशुखाद्याचा पुरवठा करत असल्याचे चित्र आहे. हरभरा कोळणा, गहू, भुसामध्ये लाकडाचा चुरा, समुद्राची वाळू मिसळून त्याचा पशुधनाला पुरवठा होत आहे. यातून शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू असून, दुसरीकडे जनावरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाने यामध्ये वेळीच हस्‍तक्षेप केला नाहीतर पशुधनांच्या आरोग्याचा प्रश्‍‍न निर्माण होणार आहे.
जिल्‍ह्याने दूध व दुग्‍धोत्‍पादनात आघाडी घेतली आहे. देशातील दुधातील नामवंत ब्रँड कोल्‍हापुरात आहेत. पशुधनासाठी वातावरण अनुकूल असल्याने राज्याबाहेरूनही जनावरांची आयात सुरू आहे. पंढरपुरी म्हशींसह परराज्यातून मुऱ्हा, म्‍हैसाणा, जाफराबादींसह गाय वर्गातील सहिवाल, गीर, सिंधी, देवणी, होलस्‍टीन फ्रिजीयन आदी जाती जिल्‍ह्यात लोकप्रिय आहेत. अधिकचे दूध देणाऱ्या जातिवंत जनावरांना त्याचपद्धतीने पशुखाद्यही द्यावे लागते. त्याचा खर्चही मोठा आहे.
जिल्‍ह्यात नामवंत कंपन्यांच्या पशुखाद्यासह काही सुमार दर्जाच्या कंपन्यांकडूनही पशुखाद्याचा पुरवठा केला जातो. काही पुरवठादार अधिक नफा कमावण्याच्या हेतूने अशा कंपन्यांचे पशुखाद्य शेतकऱ्यांच्या माथी मारत असतात. अशाच सुमार कंपन्यांमधून भेसळीचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. भेसळयुक्‍त पशुखाद्य खाल्ल्याने जनावरांना विविध आजार होणे. तसेच, दुधाच्या उत्‍पादनावरही परिणाम होत आहे. त्यामुळे जिल्‍ह्यात येणा‍ऱ्या पशुखाद्याची तपासणी होणे आवश्यक आहे.
....
कोट
राज्यातून व राज्याबाहेरून पेंड, हरभरा कोळणा, कोंडा, गोळी पेंड आदी पशुखाद्य येत आहे. मात्र, बहुतांश पशुखाद्यावर तपशिलाची नोंद नाही. प्रत्येक पोत्यात एक-दोन किलोचे पशुखाद्य कमी असून, त्यात भेसळ असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाईचा प्रस्‍ताव शासनाकडे पाठवला जाईल.
- डॉ. विनोद पवार, (जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी)
....
कोट
सोलापुरातील एका कंपनीचा हरभरा कोळणा विकत घेतला. जनावरांना तो दोन, तीन दिवस दिला. यानंतर एक, दोन म्हशी आजारी पडल्या. दूधही कमी आले. शंका आल्याने हा कोळणा पाण्यात भिजत घातला तेव्‍हा त्यात समुद्राची वाळू मिसळल्याचे निदर्शनास आले. पोत्याचे वजन वाढवण्यासाठी सदरचा प्रकार केला आहे. याबाबत संबंधितांविरोधात पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच, बहुतांश कंपन्यांकडून १, २ किलो पशुखाद्य कमीच देण्यात येत आहे.
- अक्षय पवार, पशुपालक, इस्‍पुर्ली
...
चौकट
अशी करा तपासणी
- गहू भुसा किंवा हरभरा कोळणा एका ताटात घ्या
- त्यामध्ये पाणी ओतावे
- हाताने गोल गोल फिरवत रहावे
- काही वेळाने कोंडा वर आलेला व
ताटाच्या तळाला वाळू, रेती तसेच
गारगुटीचा चुरा पहायला मिळेल.
- अगदी घरच्या घरीही भेसळयुक्‍त
पशुखाद्य ओळखता येईल