
अमल महाडिक यांनी ५०० क्षयरुग्णांना दत्तक
80969
...
अमल महाडिक यांच्याकडून
पाचशे क्षय रुग्ण दत्तक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : माजी आमदार अमल महाडिक यांनी पाचशे कुष्ठरोगी दत्तक घेवून समाजासमोर आदर्श निर्माण केला असल्याचे मत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज व्यक्त केले.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय धोरणात्मक योजनेअंतर्गत २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी राष्ट्रपतींनी ९ सप्टेंबरला प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाचा प्रारंभ केला. या योजनेअंतर्गत संस्था, उद्योग समूह, व्यक्ती, यांनी क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार आज माजी आमदार अमल महाडिक यांनी पाचशे कुष्ठरोगी दत्तक घेतले आहेत. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते ५० रुग्णांना प्रातिनिधिक स्वरूपात पोषण आहार किट वाटप करण्यात आले.
श्री. रेखावार म्हणाले, ‘‘क्षयरोगाच्या उपचार कालावधीत पोषण आहार मिळाला पाहिजे. क्षय रुग्णांना पोषण आहार घेणे हे महत्त्वाचे आहे. रुग्णांना भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे फूड बास्केट तयार केली आहे. तो आहार व्यवस्थित घेतल्यामुळे रुग्ण लवकर बरा होईल. श्री. महाडिक यांच्याप्रमाणे समाजातील इतर दानशूर लोकांनीही अशा पद्धतीने अभियानात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे.’’
माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत क्षयरोगाचे निराकरण करण्यासाठी निक्षय मित्र होण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून एक सामाजिक जबादारी म्हणून रुग्णांना पोषण आहार देणे गरजेचे आहे. टी.बी. हा पूर्णपणे बरा होतो, कोणत्याही रुग्णाने कमीपणा न बाळगता पोषण आहार व्यवस्थित घ्यावा. कोल्हापूरमध्ये दानशूर व्यक्तींची कमी नाही.’’
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानाच्या उद्देशाबद्दल माहिती दिली. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी कुंभार यांनी या अभियानाचे सध्याचे कामकाज, उद्दिष्ट्य याबाबत माहिती दिली. या वेळी माजी नगरसेवक नाना कदम, रुपाराणी निकम, आशिष ढवळे, भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, आप्पा लाड, डॉ. विनायक भोई, विनोद नायडू, विशाल मिरजकर, माया जगताप, नीलेश मोरे, दिया कोरे, अवधूत मेंडके व रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.