
प्राध्यापक करणार काळ्या फिती लावून काम
‘व्हॅलेंटाईन’ दिनी प्राध्यापक
करणार काळ्या फिती लावून काम
कोल्हापूर, ता. ६ ः विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक १४ फेब्रुवारी (व्हॅलेंटाईन डे) रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत. अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या आदेशानुसार हे आंदोलन केले जाणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या, परकीय विद्यापीठांना भारतामध्ये प्रवेश देऊ नये, विद्यापीठांना अनुदान द्या, कर्ज नको. शिक्षणाचे खासगीकरण थांबवा. जुनी पेन्शन योजना सर्वांसाठी लागू करा. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील रिक्त जागा तत्काळ भरा. डिजिटल विद्यापीठांना परवानगी देऊ नका, पदोन्नतीसाठी पीएच.डी.ची सक्ती नको, प्राध्यापकांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करा. आरक्षणाचे धोरण तंतोतंत लागू करा, अशा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्राध्यापक महासंघाने आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील २५०० प्राध्यापक सहभागी होणार आहेत. या वेळी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती प्राध्यापक महासंघाचे विभागीय सचिव प्रा. डॉ. डी. एन. पाटील यांनी आज दिली.