
पानसरे हत्या प्रकरण घटनास्थळाचा ‘डिव्हीआर’ देण्याची आरोपी पक्षाची मागणी फेटाळली
पानसरे हत्या प्रकरण
घटनास्थळाचा ‘डीव्हीआर’ देण्याची
आरोपी पक्षाची मागणी फेटाळली
पुढील सुनावणी २१ ला; समीर गायकवाडच्या प्रकृतीचा अहवाल द्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.७ ः ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या ठिकाणाचा ‘डीव्हीआर’ सरकार पक्षाकडून मिळावा, हा संशयित आरोपींच्या वकिलांचा अर्ज आज न्यायालयाने नामंजूर केला. संशियत आरोपी समीर गायकवाडच्या पायावर होणारी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचा हुद्दा, शिक्का नसल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन खात्री करावी, त्याचा अहवाल नऊ फेब्रुवारीला न्यायालयात सादर करावा, असाही आदेश आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी दिला. सरकार पक्षातर्फे ॲड. हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. पुढील सुनावणी २१ फेब्रुवारीला होईल.
प्रत्यक्षात साक्षीदार तपासणी कामासाठी आरोपी पक्षाकडून कोणतेही म्हणणे आजही सादर झाले नाही. डीव्हीआर मिळाला नसल्याचे आरोपींच्या वकिलांनी सांगितले. यावर ॲड. निंबाळकर यांनी लेखी म्हणणे मांडले, की डीव्हीआर तपासणीसाठी गुजरातच्या लॅबोरेटरीमध्ये पाठविला होता. अधिक अंतर असल्याने तो अस्पष्ट असल्याचा त्यांचा अहवाल आहे. त्यामुळे सरकार पक्षाने तो पुरावाच ग्राह्य धरला नाही. ‘चार्जशीट’ घेतला नाही. त्यामुळे त्याची कॉपी देण्याचा प्रश्नच नसल्याचे म्हटले. यानंतर न्यायालयाने आरोपी पक्षाचा अर्ज निकाली काढला. गायकवाडवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे तो हजर राहू शकत नसल्याच्या अर्जावर सरकारी पक्षाने कोणतीही हरकत घेतली नाही. त्यामुळे न्यायालयाने तो मंजूर केला.
दरम्यान, कोल्हापूरच्या ‘एसआयटी’कडे हजेरी होती. ती दोन महिने माफ करावी, असे गायकवाडच्या अर्जात म्हटले होते. त्यावर एटीएसने त्याच्यावर उपचार सांगलीत होत असतील, तर बरे होईपर्यंत सांगलीच्या पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी, तब्येत बरी झाल्यानंतर कोल्हापूरऐवजी त्याने पुण्यात एटीएसकडे हजेरी द्यावी. कारण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास आता एटीएसकडे दिला आहे, असे म्हणणे मांडले.
सरकार पक्षातर्फे गतवेळी साक्षीदार पंचनाम्यांची सूची न्यायालयात सादर केली आहे. त्यावर आरोपी पक्षाने हरकत घेतली आहे. यावर त्यांनी काही मुद्दे कबूल केले, तर ते वगळून इतर साक्षीदार तपासले जातील, असे न्यायालयात सांगण्यात आले. सरकारी पक्षाने २३१ साक्षीदार, पंच, पंचनामे यांची सूची न्यायालयात आज पुन्हा दिली. साधारण शुक्रवारी-शनिवारी अशी सलग सुनावणी घ्यावी, अशीही विनंती ॲड. निंबाळकर यांनी केली. यावेळी मेघा पानसरे, दिलीप यादव न्यायालयात हजर होते.
आरोपींतर्फे ॲड. प्रीती पाटील यांनी काम पाहिले. त्यांनी डीव्हीआर मिळण्यासाठी आग्रह धरला होता. समीर गायकवाडवर सरकारी आणि काही खासगी रुग्णालयातही उपचार करायला कोणी तयार नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया होईल, अशा दवाखान्यात दाखल केल्याचे सांगून त्याची हजेरी रद्द करावी, अशी मागणी आजही न्यायालयात केली.
सरकार पक्षाच्या अर्जामध्ये समीर गायकवाडच्या पायाची शस्त्रक्रिया होणार आहे, असे म्हटले आहे. मात्र अर्जात डॉक्टरचे पद वगैरे माहिती नाही. संबंधित डॉक्टर बीएएमएस आहे. पायावरील शस्त्रक्रिया करण्यासाठी अस्थी रोग तज्ज्ञ (ऑर्थोपेडीक सर्जन)ची आवश्यकता आहे. त्यामुळे नेमके काय झाले आहे, याची खातरजमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याचे ॲड. निंबाळकर यांनी सांगितले.