
मालिका
११९८६
लोगो ः भन्नाट माणसं...प्रेरक कहाणी ः भाग - ४
रंगभूमीच्या वेडातून ‘शिवगर्जना’ महानाट्याची निर्मिती...!
शिवाजी पेठेतील स्वप्नील यादव यांचा कलासक्त प्रवास, कला क्षेत्रातून मिळणारा आनंद ठरतोय वेगळा
संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ‘पोलिस उपनिरीक्षक व विक्रीकर निरीक्षकपदाची पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालो. मुख्य परीक्षेकडे मात्र पाठ फिरवली. सहकार खात्यातील परीक्षेत उत्तीर्ण झालो होतो. पुढे दोन खासगी बँकांत सेल्स एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट म्हणून काम पत्करले. रंगभूमीच्या वेडातून ‘शिवगर्जना’ महानाट्य साकारले. महानाट्याचे दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. आजवर तब्बल ७५ प्रयोग सादर झाले’, शिवाजी पेठेतील स्वप्नील चंद्रकांत यादव सांगत होते. आवडत्या क्षेत्रात झोकून द्यायचे ठरवले आणि त्यातून मिळत असलेला आनंद मोठा आहे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
श्री. यादव पेठेतील न्यू कॉलेजचे विद्यार्थी. त्यांनी ‘डिप्लोमा कोर्स इन ड्रामाटिक्स’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ‘मास्टर परफॉर्मन्स आर्टस् इन ड्रामाटिक्स, ॲक्टिंग स्पेशलायझेशन’मधून पदव्युत्तर पदवी मिळवली. तीन वर्षे कलापथकातील कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. एकांकिका, लोकनृत्य, पथनाट्य, मूकनाट्य, एकपात्रीसह मिमिक्रीत त्यांची विशेष छाप. शिवाजी विद्यापीठात २००७ ला इंद्रधनुष्य स्पर्धेत त्यांनी मूकनाट्य स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. साकोजीराव टांगमारे नाटकाच्या दोनशे प्रयोगांत अभिनय केल्यानंतर त्यांनी २००९ ला शिवगर्जना महानाट्याची निर्मिती केली. त्यांना ९ मराठा बटालियनच्या वर्धापनदिनानिमित्त माजी लष्करप्रमुख जे. जे. सिंग यांच्यासमोर महानाट्य सादर करण्याची संधी मिळाली. पुढे २०१० ला छत्रपती शिवाजी स्टेडियम, जम्मू-काश्मीर येथे मराठा बटालियन येथे महानाट्याचे प्रयोग केले. पुढे २०१२ ला महानाट्याची कक्षा रूंदावली. मध्यमवर्गीय कुटुंबातले असूनही त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. ३५० कलाकार, १२० लांब व ५२ फूट उंचीचा सेटअप, हत्ती, घोडे, उंट यांचा सहभाग महानाट्यात झाला. महानाट्याचे सलग २० प्रयोग बेळगावात झाले.
पुढे इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सांभाळत त्यांनी कोल्हापूर, पुणे, बीड, जामनगर (गुजरात), बिकानेर (राजस्थान), निपाणी (कर्नाटक) येथे मराठी व हिंदीत प्रयोग केले. दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लष्कर प्रमुख बिपीन रावत, नेव्ही जनरल सुरेश लांबा, तर बेळगावात गतवर्षी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत प्रयोग सादर झाले.
----------------
महानाट्य उभे करणे सोपे नक्कीच नाही. शिवछत्रपतींचा तेजस्वी इतिहास लोकांना कळावा, हा माझा दृष्टिकोन आहे. महानाट्यात २०१२ ला मला २५ लाख रुपयांचा फटका बसला. मी डगमगलो नाही. २०१३ ला जनरल नरेंद्र सिंह यांच्यासमोर शिवछत्रपतींचा इतिहास व मराठा रेजिमेंट यांच्यातील साम्य दाखवणारा प्रयोग सादर केला. त्यासाठी तत्कालीन कमांडर संतोष कुरूप यांचे मार्गदर्शन मिळाले आणि प्रयोग हिट झाला.
- स्वप्नील यादव, दिग्दर्शक, शिवगर्जना महानाट्य