
लंपी प्रकरणी सव्वा कोटींचे अर्थसहाय्य वाटप
लम्पीप्रकरणी सव्वा कोटीचे अर्थसहाय्य
पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार; ४४८ पशुपालकांना नुकसानभरपाई
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : जिल्ह्यातील ज्या पशुपालकांची जनावरे लम्पीने मृत पावली त्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आजअखेर ४४८ मृत जनावरांच्या पशुपालकांना १ कोटी २५ लाख ५३ हजारांची नुकसानभरपाई दिली आहे. उर्वरित पशुपालकांनाही नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.
जिल्ह्यात लम्पीने ९९२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. यांत ६९१ गायी, २५१ बैल, तर ५० वासरांचा समावेश आहे. यांपैकी ७५६ जनावरांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी संबंधित पशुपालकांनी अर्ज केले आहेत. यांतील ४४८ लाभार्थींना अर्थसहाय्य दिले आहे. यामध्ये ३२१ गायी, ९९ बैल, तर २८ वासरांसाठी नुकसानभरपाई दिली आहे. गायीसाठी ३०, बैलासाठी २५, तर वासरासाठी १६ हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मृत गायींसाठी सर्वाधिक ९६ लाख ३० हजार रुपये नुकसानभरपाई दिली आहे. बैलांसाठी २४ लाख ७५ हजार, तर वासरांसाठी ४ लाख ४८ हजार इतकी नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती डॉ. पवार यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील अजून २३६ लाभार्थींनी नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव दिलेले नाहीत. हे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे. एकही पशुपालक अर्थसहाय्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रयत्नशील आहे. आता लम्पीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे; मात्र सर्व पशुपालकांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.