
विशाळगड अतिक्रमण
81641
विशाळगडावरील अतिक्रमण काढणारच
जिल्हाधिकारी राहुल रेखावार : शिवप्रेमींकडून शनिवारची कार सेवा रद्द
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : विशाळगडावरील अतिक्रमण निश्चितपणे काढली जातील. ही अतिक्रमण कायमस्वरूपी काढणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. त्यामुळे, अतिक्रमण काढण्याकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि गडप्रेमींकडून शनिवारी (ता. १८) नियोजित असणारी कार सेवा रद्द केली आहे.
जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महारांचे प्रेरणास्थान असलेल्या विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हा प्रशासन नियोजन केले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळाला आहे. गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले जाईल. अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य पाऊल उचलले आहेत. याची तयारीही केली आहे. अतिक्रमणधारकांच्या जागेची मोजणी झालेली आहे. त्यानूसार त्यांना नोटीस दिली आहे. गडावर जेसीबीसारखी मशिन घेवून जाता येत नाही. त्यामुळे हे सर्व कामे मजुरांकडूनच करुन घ्यावी लागणार आहेत. यासाठी विशेष तरतूद करुन निधी दिला आहे. हे काम अंतिम टप्प्यात येईल. अतिक्रमण काढताना शांततेने आणि कायदानूसार काढले जाईल. कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. यासाठी शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींनीही सहकार्य करावे. विशाळगडावरील अतिक्रमण धारकांना ही सर्व परिस्थिती सांगितली आहे. सध्या जे अतिक्रमण करत आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. जे कायदेशीर आहे ते कायम केले जाईल.’
जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, ‘विशाळगडावरील मद्य विक्री, गांजा विक्री, चरस विक्री पूर्ण बंद केली जाईल. याशिवाय, पशु, पक्षांची होणारी कत्तल थांबवले जातील. यासाठी नियोजन केले आहे. गडावर नशा करणाऱ्या नशेबाजांवर फौजदारी दाखल केली आहे. दरम्यान, शनिवारी शिवप्रेमींकडून केली जाणार कार सेवा रद्द करावी. याच दिवशी गृहमंत्री अमित शहा जिल्हा दौऱ्यावर आहेत. तेथे पोलिस बंदोबस्त द्यावा लागणार आहे. पण, गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांकडून कोणतीही कसूर राहणार नाही.’
दुर्गप्रेमी हर्षल सुर्वे म्हणाले, ‘जिल्हा प्रशासन व पोलिसांनी गडावरील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आता कोणताही जात-पात न पाहता, ज्यांनी-ज्यांनी गडावर अतिक्रमण केले आहे. त्यांची अतिक्रमण काढली पाहिजेत. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानूसार शनिवारची कार सेवा स्थगित केली आहे.’ विजय देवणे, बंडा साळोखे, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, उपवनसंरक्षक जी गुरुप्रसाद, तहसीलदार गुरु बिराजदार उपस्थित होते.
चौकट
शाहुवाडी पोलिस निरिक्षकांचे अभिनंदन
शाहुवाडी पोलिस निरिक्षक प्रकाश गायकवाड यांनी विशाळगडावरील मद्यपी व गांजा विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली. यामध्ये काहींना शिक्षाही झाली आहे. याबद्दल गायकवाड यांचे शिवप्रेमी व दुर्गप्रेमींकडून अभिनंदन करण्यात आले.