रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

81780, 81924

लोगो ः रिपोर्ताज
नंदिनी नरेवाडी

लशीची सुई...बाळास उदंड आयुष्य देई...
बालकांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग लसीकरण कार्यक्रम राबवते. प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्यातून एखाद्या विशिष्ट भागांमध्ये अंगणवाडी केंद्र किंवा नागरी आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण केले जाते. यावेळी परिसरातील बालकांना घेऊन बाळाची आई, आजी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती लसीकरण केंद्रात जाते. काही महिन्यांच्या बाळासा लस द्यायची असल्यामुळे घरातील सर्वांवरच ताण येतो. हा ताण हलका करण्याचा प्रयत्न नर्स करत असतात...आणि हे लसीकरण सुसह्य करण्यासाठी प्रयत्नशील असतात...
- नंदिनी नरेवाडी
.....................

सकाळी नऊची वेळ. फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्रावर बालकांसाठी लसीकरणाची उडालेली झुंबड. कोवळ्या उन्हात दुपट्यात गुंडाळलेल्या बाळांना घेऊन आई आणि आजी केंद्रावर येत होत्या. केंद्रावर येताच लशी उपलब्ध आहेत का?, दिलेली लस बाळाला सोसेल का? त्याला काही त्रास तर होणार नाही ना? नर्स काही बोल लावतील...अशा काहीशा तणावातच लसीकरण सुरू होण्याची प्रतीक्षा करीत माता बसलेल्या होत्या. लसीकरण केंद्रावर आशा स्वयंसेविका, नर्स आणि डॉक्टरांकडून लसीकरणाची तयारी पूर्ण झाली आणि त्यांनी बालकांना लस देण्यास सुरवात केली. लसीकरणाचे कार्ड तपासत यापूर्वीचे सर्व डोस दिले आहेत का? याची पडताळणी करून लस दिली जात होती...लस टोचताच बालकांच्या रडण्याने त्यांच्या मातांचे चेहरे रडवेले होत होते...

ज्येष्ठ महिला सोबत हवीच...
एक महिला अडीच महिन्यांच्या बाळाला घेऊन लसीकरण केंद्रात आली. बाळाच्या डोळ्यात घातलेले काजळ पाहताच नर्सने ‘लहान मुलांच्या डोळ्यांत काजळ घालू नका, कितीही सांगितले तरी तुम्ही ऐकत नाही’, असे सांगत तक्रारीचा सूर ओढला. त्यावर त्या महिलेने ‘अहो, घरातच काजळ पाडलंय’ असे सांगत बाजू मांडली. दुसऱ्या एका बाळाला घेऊन बाळाची आई लस देण्यासाठीच्या खुर्चीत बसली. लस देताना बाळ हलेल म्हणून नर्सने बाळाला घट्ट धरण्याची सूचना केली; मात्र बाळाला लस देताना सुई टोचली जाणार म्हणून आईनेच तोंड फिरवले आणि सुई टोचतानाच बाळाने लाथ मारली. लाथेने सुई उडाली, मात्र लस देऊन झालेली असल्याने नर्सने नि:श्वास टाकला. ‘‘येताना घरातील ज्येष्ठ महिलेला घेऊन येत जा,’’ असे सुनावले. इतर महिलांनाही त्यांनी हाच सल्ला दिला. याच वेळी लस दिल्यावर बाळाला ताप येईल का?, अंघोळ घातली तर चालेल का?, असे प्रश्न आई - आजींकडून विचारले जात होते. त्याला त्या एकसारख्या उत्तर देत होत्या. दरम्यान, न्यूमोनिया व मेंदूज्वरावरील (पीसीव्ही) लस उपलब्ध नसल्याने दीड, अडीच व साडेतीन महिन्यांच्या बालकांना दोनच लसी देऊन माघारी पाठवले जात होते. लस उपलब्ध झाल्यानंतर संपर्क साधू, असे सांगितले जात होते. त्यावर महिलांकडून नाराजीचा सूर उमटत होता.

सावलीसाठी झाडांचाच आधार
ऊन वाढेल तशी गर्दीही वाढू लागली. लसीकरण केंद्राच्या आत अपुरी जागा असल्याने पालकांना बाळाला घेऊन काही वेळ बाहेर थांबावे लागत होते. नंबर येईल तसे आत सोडले जात होते. मात्र तोपर्यंतचा वेळात बाळाला ऊन लागू नये, यासाठी परिसरातील झाडांचा सावलीसाठी आधार घेतला जात होता. ताटकळत उभे राहावे लागत असल्याने एका आजीने खाली बसूनच बाळाला मांडीवर घेतले.
-------
चौकट
निवाऱ्याची व्यवस्था करावी
उपनगरातील बहुंताश आरोग्य केंद्रावर गुरूवारी लसीकरणाचे सत्र राबवले जाते. त्या दिवशी लहान बालकांना घेऊन पालकांची गर्दी होती. त्यांचे उनापासून बचाव व्हावा, यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. शिवाय एकाच वेळी सर्व लसी बालकांना मिळाव्यात, याचीही व्यवस्था आरोग्य विभागाने करण्याची आवश्‍यकता आहे. बहुंताश लसीकरण केंद्रांवर लस दिल्यानंतर बालकांची काळजी कशी घ्यावी, याबाबत सूचना फलक नाहीत, ते लावले तरी नर्सवरील बराचसा ताण कमी होऊ शकतो.
-------
कोट
६३ हजार लोकसंख्या असलेल्या फुलेवाडी व परिसरातील बालकांसाठी केंद्रावर लसीकरणाचे सत्र राबविले जाते. शिवाय महिन्याच्या ठराविक दिवशी परिसरातील १८ छोट्या केंद्रावरही लस देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. बालक आजारी असेल किंवा एक डोस देऊन महिना पूर्ण झाला नसल्यास त्यांना या लसीकरण केंद्रावर बोलावले जाते.
- डॉ. सुनील नाळे, वैद्यकीय अधिकारी, फुलेवाडी नागरी आरोग्य केंद्र