निबंधाचे विषय बनले पी.एचडीचे शोधनिबंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निबंधाचे विषय बनले  पी.एचडीचे शोधनिबंध
निबंधाचे विषय बनले पी.एचडीचे शोधनिबंध

निबंधाचे विषय बनले पी.एचडीचे शोधनिबंध

sakal_logo
By

लोगो
....


निबंधाचे विषय झाले
पीएच. डी.चे शोधनिबंध

निकष शिथिल केल्याने पीएच. डी.च्या दर्जावर प्रश्नचिन्ह

ओंकार धर्माधिकारी ः सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ ः विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थी पीएच. डी. संपादित करतात. मात्र, त्यांच्या संशोधनाचे विषय हे निबंधासारखेच असतात. त्यामुळे पीएच. डी.चा दर्जा खालावला आहे, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. निवड समितीने विषय निवडताना जर खबरदारी घेतली, तर अशा पद्धतीने विषय निवडले जाणार नाहीत. तसेच गाईडची निवडही गुणवत्तेच्या निकषावर झाली, तर पीएच. डी.चा दर्जा टिकून राहील.
एका काळ असाही होता की, ज्या काळात वर्षाला मोजके विद्यार्थी पीएच. डी. संपादित करू शकत होते. त्यांच्या पीएच. डी.चे विषयही समाजोपयोगी होते. विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली सखोल अभ्यास आणि संशोधन करायचे. त्यामुळे त्यांचे शोधप्रबंध पुढच्या संशोधकांसाठी मौल्यवान ठरायचे. त्यांच्या संशोधनात अनेक गोष्टी पहिल्यांदाच समाजासमोर यायच्या. मूलभूत संशोधन व्हायचे. समाजोपयोगी संशोधनातून मानवी प्रश्नांवरची उत्तरे मिळायची. पी. एचडी.चे विषय बहुआयामी होते. मात्र, गेल्या काही वर्षांत पीएच. डी.च्या विषयांचा दर्जा खालावला आहे. मानव्यशास्त्रातील बहुतांशी विषय तुलनात्मक किंवा एखाद्या व्यक्तीच्या कार्यावर असतात. बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींवर पीएच. डी. केली जाते त्यांचे कार्यही तेवढे मोठे असतेच, असे नाही. गेल्या काही वर्षांत विज्ञान विषयातील पीएच. डी.ही फारशा संशोधनात्मक नसतात. त्यामुळे पीएच. डी.च्या दर्जाबद्दलच आता प्रश्नचिन्ह उभे आहे.
या सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे पीएच. डी. करण्यासाठीचे निकष शिथिल करण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी प्राध्यापक होण्यासाठी नेट-सेट आणि पीएच. डी. असा निकष होता. मात्र, नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे अवघड असल्याने विद्यार्थी पीएच. डी. करण्याचा मार्ग निवडायचे. पीएच. डी.चे मार्गदर्शकही पूर्वी कमी होते. मात्र, त्यांचा निकष शिथिल केल्यामुळे संशोधनाचा कमी अनुभव असणारे प्राध्यापकही मार्गदर्शक झाले. पीएच. डी.चे संशोधन हे केवळ एक पदवी संपादित करण्याच्या उद्देशानेच केले जाऊ लागले. त्यामुळे पीएच. डी. धारकांची संख्या वाढली; पण शोधनिबंधांचा दर्जा खालावला.
------
‘विद्यापीठ अनुदान आयोगाने निकष शिथिल केल्याने पीएच. डी.च्या मार्गदर्शकांची संख्या वाढली. केवळ एक पदवी संपादित करणे हा मर्यादित दृष्टिकोन ठेवल्याने शोधनिबंधांच्या विषयांचा दर्जाही खालावला आहे. यामध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे.
- प्रा. डॉ. अशोक चौसाळकर, माजी विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग
------------------

हे होणे आवश्यक ...

- पीएच. डी.साठी विषय निवडताना अधिक कठोर मूल्यमापन आवश्यक
- शोधनिबंधासाठी विषय निवडण्याचे निष्कर्ष ठरवणे गरजेचे
- विषयाची समाज उपयोगिता, मूलभूत संशोधन आणि संशोधनासाठीचा स्कोप पडताळणे आवश्यक