राघवाचा धर्म गाजो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राघवाचा धर्म गाजो
राघवाचा धर्म गाजो

राघवाचा धर्म गाजो

sakal_logo
By

व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली देणारा दासबोध
आज श्री रामदास नवमी. समर्थांची ग्रंथसंपदा विपुल आहे. श्री गणेशाची आरती, श्री शंकराची आरती, श्री हनुमंताची आरती आपण नित्य गातो. मन निर्मळ, शुद्ध आणि खंबीर करणारे मनाचे श्‍लोक, संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली देणारा दासबोध, रामायण, करुणाष्टके, पंचवीस प्रश्‍न व पंचीकरणादी अभंग आवर्जून वाचावे आणि प्रत्यक्ष कृतीत आणावेत, असा संकल्प करू.
- दीपक भागवत
--------------

समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत श्रीराम. एक पत्नी, एक वाणी, एकवचनी असा मर्यादापुरुषोत्तम श्रीराम.

राघवाचा धर्म गाजो । कीर्ति अद्‌भूत माजो ।
ठाई-ठाई देवालयें । भक्तमंडळी साजो ।
शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे ।
इहलोक परलोक । शत्रू सर्व रोधावे ।।

वारकरी संप्रदायातील भक्तिपरंपरा राखत समर्थांनी सगुण-साकार ईश्‍वराची उपासना सांगितली आहे. र्इश्‍वरभक्ती आत्मकल्याण साधते. सगुण-साकाराची आराधना करता-करता निर्गुण-निराकाराकडे या मानवी जीवनाचा प्रवास करावा आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावे, ही यामागची संकल्पना आहे. या भक्तिप्रवासात असताना प्रपंच ही बाब अनिवार्य ठरते. गृहस्थाश्रमात माणसाने प्रपंच कर्तव्यदक्षतेने आणि उत्तम संपन्न करावा, असे समर्थ सांगतात.

प्रपंची जो सावधान । तो परमार्थ करील जाण ।
प्रपंची जो अप्रमाण । तो परमार्थी खोटा ।।

धर्म-अर्थ-काम-मोक्ष असे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. धर्म हा प्रामाणिक वर्तन सांगणारा आहे. ईश्‍वर आणि आत्मा यांचे दृढ नाते सांगणारा आहे. प्रामाणिकपणे चाकरी किंवा उद्योग करून प्रपंचाच्या निर्वाहास्तव अर्थप्राप्ती करून घ्यावी. विवाह संस्कारानंतर गृहस्थ-गृहिणी दोघांनी वंशविस्तार करावा. हे करीत असताना ईश्‍वराला म्हणजेच नीतिधर्माला विसरू नये. अतिथीला ईश्‍वर मानून त्याचे स्वागत करावे. या आश्रमात तहानलेल्याला पाणी, भुकेल्यालाला अन्नाचा घास द्यावा. सत्पात्री दानधर्म करावा. या दानाचे श्रेय स्वतःकडे न घेता, ज्या ईश्‍वराने मला दान करण्याइतके सामर्थ्य दिले आणि ज्याने मला दान करण्याची प्रेरणा दिली, त्या ईश्‍वराच्या चरणी ते श्रेय समर्पित करावे. प्रपंच ईश्‍वरसाक्षीने करावा. हाच खरा मोक्षमार्ग आहे.
मारुती हा निस्सीम रामभक्त. हा वेद जाणणारा बुद्धिमान, वेगवान, शक्तिमान आणि इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला जितेंद्रिय. समर्थांनी १) शहापूर, २) मसूर, ३) उंब्रज, ४) शिराळे, ५) मनपाडळे, ६) पारगाव, ७) माजगाव, ८) बहेगाव, ९) शिंगणवाडी, १०) आणि ११) चाफळ असे अकरा मारुती स्थापन केले. ग्रामरक्षण आणि ग्रामसंस्करण असा यामागचा हेतू होता. मारुती कर्तव्यदक्ष होता. तसे आज तरुणांनी कर्तव्यदक्ष राहावे. मारुती हा संयमी ब्रह्मचारी होता. त्याप्रमाणे आजच्या युवकांनी संयमी, निर्व्यसनी असावे. हनुमंत शक्तिमान असून, आपल्या शक्तीचा वापर अतिशय योग्य ठिकाणी करीत असे. त्याने ‘शक्ति-प्रदर्शन’ कधीच केले नाही. आज तरुणांनी शक्तिमान व्हावे. पूर्ण शक्ती वापरून रचनात्मक आणि विधायक कार्ये करावीत. प्रसंगी दीनदुबळ्यांच्या आणि अबलांच्या रक्षणासाठी आपल्या शक्तीचा वापर करावा. समर्थांनी स्थापिलेले अकरा मारुती हाच उपदेश आपल्याला करीत आहेत.