हमालाचे जगणे

हमालाचे जगणे

Published on

बिग स्टोरी
अमोल सावंत

82864

हमालांचे कष्टाळू जगणे; व्‍यापारी-ग्राहकांतील दुवा, पोट भरण्यासाठी जीवतोड मेहनत

अपार कष्टातून
उदरनिर्वाहाचे ‘ओझे’

लीड
धान्य-कडधान्य, मिरची, भाजी किंवा जीवनावश्‍यक अन्य वस्तू शेती, उद्योगातून उत्पादित होतात; मात्र या सर्व वस्तू घरापर्यंत येण्यासाठी अनेक माध्यमे कार्यरत असतात. सर्व उत्पादित वस्तू पहिल्यांदा गोडावून, किराणा माल, मॉल्समध्ये येतात; मग विक्री होते. ग्राहक ते घरापर्यंत आणतात. वस्तूंचा विनियोग होतो. यामधील शृंखलांमध्ये हमालसुद्धा दुवा म्हणून काम करतो. टेम्पो, ट्रकमधून आलेला माल उतरवायचा... तो पाठीवर घ्यायचा... आत दुकानात दुकानदार, व्यापारी सांगेल तसा ठेवायचा... काम कष्टाचं जरूर आहे; पण अनेकांना यातून रोजीरोटी मिळाली. चार पैसे मिळू लागले. ज्यांची कष्टाची तयारी आहे, ते लोक न लाजता हमाल म्हणून काम करतात. संसार उभारण्यासाठी मदत करत आहेत. एकूणच हमालांच्या जगण्याचा वेध...
ःःः----------------
सकाळी सातलाच घराबाहेर...
हमालांचं कृषी उत्पन्न बाजार समितीचा आवार, लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, शाहूपुरी व्यापारी पेठ, लक्ष्मीपुरी धान्यलाईन आदी ठिकाणी अस्तित्व दिसतं. शाहूवाडी, कोतोली, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी भागांतून सकाळी सात वाजता ते घर सोडतात. मजल-दरमजल करत एसटीने जिथे कुठे हमाली करायची आहे, तिथे येतात. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, लातूर, बार्शी, उदगीर, सोलापूर, उत्तर कर्नाटकाबरोबर देशाच्या अन्य भागांतून विविध मालांची आवक सुरू असते. टेम्पो, ट्रकच्या माध्यमातून माल कोल्हापूरला येतो. ट्रक, टेम्पो किराणा माल, धान्य कडधान्यांच्या दुकानात आला की, टेम्पो, ट्रकच्या फाळक्यापर्यंत पोतं ओढून आणणाऱ्याला ‘वारणी’ हमाल म्हणतात, तर फाळक्यापासून दुकानाच्या आतपर्यंत वाहतूक करणाऱ्याला माथाडी म्हणतात. माथाडी हा दुकानातील नोंदीत कामगार म्हणून काम करत असतो.

वेळप्रसंगी दुकानाशेजारीच चूल...
ग्रेन मर्चंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, शहरात १३० ते १५० मिरची, धान्य-कडधान्ये दुकाने तर कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशनने दिलेल्या माहितीप्रमाणे, शहरात तीन हजार दुकाने आहेत. या सर्व ठिकाणी दुकानात माल नेण्यासाठी ‘हमाल’ लागतोच. बरेच हमाल गावाकडून सकाळी लवकर बाहेर पडतात. संबंधित दुकानामध्ये दिवसभर काम करतात. संध्याकाळी गावाकडे जायला वेळ झाला की, जिथे दुकानात काम केलेले असते, त्या बाजूलाच चूल मांडून जेवण तयार करतात. रात्री तिथेच झोपतात. सकाळी उठून पुन्हा कामाला उभे राहतात. संघटित, असंघटित असे हमालांचे प्रकार असले तरी अनेकांना रोजीरोटीसाठी काम करण्याची इच्छा असते. असे कामगारसुद्धा हमाली करतात. रविवार, एक मे कामगार दिन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला हमालांना सुटी असते. माल उतरविणे, भरणे प्रक्रियेत ते असतात. सकाळी सात ते आठ वेळेत दुकानासमोर येतात, तर संध्याकाळी सहा ते साडेसातपर्यंत काम करत असतात. गावाकडून येताना जेवणाचा डबा घेऊन येतात. दुपारी जेवण करतात. माल आला की, मग माल उतरवणे, भरणे काम सुरू राहते.
...

कोटस्‌
हमाल इमानेइतबारे काम करतात. अशा हमालांसाठी माथाडी बोर्डाने जो दर ठरविलेला असतो, ती मजुरी आणि ३० टक्के लेव्ही ही व्यापारी नोंदीत हमालाच्या नावे माथाडी बोर्डामध्ये भरतात. ज्याद्वारे हमाल जे दिवसभर कष्ट करतात, ती रक्कम हमालाला मिळते. हमालाच्या कष्टाचे चीज होते.
- श्रीनिवास मिठारी
.............
कोल्हापूर शहरात तीन हजार किराणा मालाची दुकाने आहेत. ही दुकाने दाटीवाटीच्या ठिकाणी उभी आहेत. अशावेळी मुख्य रस्त्यावर थांबलेल्या टेम्पोतून जो माल आहे, तो माल व्यवस्थितपणे किराणा मालाच्या दुकानापर्यंत आणला जातो. अनेकदा मालाचे वजन जास्त असते; पण हमालाचं खरे ‘स्कील’ तेच आहे. ते दाटीवाटीतून दुकानापर्यंत माल घेऊन येतात.
- संदीप वीर, कार्याध्यक्ष, कोल्हापूर किरकोळ दुकानदार असोसिएशन
---------
सकाळी लवकर उठून गावाकडून एसटी बसमधून कोल्हापूरकडे यावे लागते. रविवारी सुटी मिळते. सुटी असली की, घरातील अन्य कामे करावी लागतात. खूप वेळ झाला तर कोल्हापूरमध्येच थांबतो. तिथे स्वत: जेवण तयार करतो. जे काम आहे, ते आनंदाने करतो. समाधान वाटते.
- बाजीराव पाटील, करंजफेण
............

चौकट
मजुरी अशी...
माथाडी बोर्डाने एक ते १०, १० ते ३५, ३६ ते ५०, ५१ ते १०० किलोप्रमाणे मजुरीचे दर ठरवून दिलेले आहेत. त्याप्रमाणे व्यापारी ही मजुरी बोर्डाकडे देतात. मग बोर्ड त्याप्रमाणे ठरलेले पैसे हे माथाडींना देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com