
भावकीमुळे उसाचे झाले जळण!
83086
चंदनकूड : भावकीमुळे तुटलेला ऊस वाळला असून तुटायचा शिल्लक ऊस तसाच उभा आहे.
भावकीमुळे उसाचे झाले जळण!
२२ दिवस ऊस शेतातच; पोलिस बंदोबस्तात जाणार उर्वरित ऊस
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : चंदनकूड (ता. गडहिंग्लज) येथील एका उत्पादक शेतकऱ्याचा तुटलेला पाच ते सहा टन ऊस २२ दिवस उलटले तरी अजून गाळपाला गेलेला नाही. त्याचे आता जळण तयार झाले आहे. भावकीच्या आडवाआडवीतून हा प्रकार घडला असून आता पोलिस बंदोबस्तामध्ये संबंधित क्षेत्रातील उर्वरित ऊस तोडून पाठविण्याची तयारी शेतकऱ्याने सुरू केली आहे.
सुभाष पाटील असे या नुकसानग्रस्त उत्पादक शेतकऱ्याचे नाव आहे. भाऊबंदकीत दोन्ही बाजूने एकमेकांना झालेल्या अडवणुकीच्या इर्षेतून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. २४ जानेवारीला त्या शेतकऱ्याच्या उसाला तोड आली. एक ट्रॉली ऊस गेल्यानंतर दुसऱ्यासाठी भावकीने अडवणूक केली. अजूनही ५० ते ६० टन होईल इतका त्यांचा ऊस आहे. तुटलेला ऊस पाच टनांपर्यंत आहे. तो वाळत असल्याने ऊस वाहतुकीसाठी अडवणूक होत असल्याची तक्रार त्यांनी तहसीलदारांकडे केली. या तक्रारीच्या आधारे तहसीलदारांनी संबंधित मंडल अधिकाऱ्यांना पंचनाम्याचे आदेश दिले. दरम्यान, पंचनाम्याचा अहवाल मिळाल्यानंतर तहसीलदार व पोलिस उपनिरीक्षकांनी त्या शेतकऱ्याच्या भाऊबंदांना ऊस वाहतुकीला अडथळा न करण्याची सूचना केली. तेव्हा ऊस नेण्यास भावकीने कबुली दिली. त्याच्या दुसऱ्या दिवशी उसाची तोड सुरू असताना पुन्हा अडवणूक झाली. त्याचीही तक्रार त्या शेतकऱ्याने केली. त्यानंतर तहसीलदारांनी ६ फेब्रुवारीच्या पत्राद्वारे पोलिस बंदोबस्त देण्याची सूचना पोलिस निरीक्षकांना दिली; परंतु दोन-चार दिवस उलटले तरी काहीच हालचाली न झाल्याने १० फेब्रुवारीला ते शेतकरी पोलिसांकडे गेले. त्यावेळी त्यांना बंदोबस्ताची रक्कम भरण्यास सांगितले आहे.
--------------
चौकट...
२२ दिवसांचे हेलपाटे...
‘ते’ ५७ वर्षीय शेतकरी ऊस अडवल्याच्या पहिल्या दिवसापासून (२४ जानेवारी) आजअखेर (ता. १५) उभा ऊस घालवण्यासाठी चंदनकूड...हलकर्णी...गडहिंग्लज...कोल्हापूर असे हेलपाटे मारत आहेत. कर्जबाजारी असलेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांनी काहीतरी करून पोलिस बंदोबस्ताच्या शुल्काची बेगमी केली. मंगळवारी (ता. १४) शुल्क भरण्यासाठी ते पोलिस ठाण्यालाही आले. त्यावेळी पोलिस अधीक्षकांची परवानगी आणण्याची सूचना त्यांना केली.
---------------
चौकट
परवानगी आणली, पण...
आज सकाळी अधीक्षकांची परवानगी आणण्यासाठी शेतकरी कोल्हापुरात पोहचले. ती परवानगी घेऊन सायंकाळी ते गडहिंग्लज पोलिस ठाण्याला आले. तितक्यात ऊस तोडीसाठी तयार केलेल्या दोन्ही टोळ्यांनी अचानक नकार दिल्याने पुन्हा त्यांच्या नशिबी संघर्ष आला. टोळीच मिळेना तर बंदोबस्तासाठी पैसे कसे भरायचे, या विचारात ते खिन्न मनाने सायंकाळी उशिरा गावाकडे परतले.
----------------
कोट
उत्पादकाच्या उसासाठी पोलिस बंदोबस्त देण्याचा तहसीलदारांचा आदेश आहे; परंतु खासगी बंदोबस्त असल्याने तो सशुल्क द्यावा लागतो. अधीक्षकांची परवानगी व सशुल्क बंदोबस्ताची सूचना आठ दिवसांपूर्वीच उत्पादकाला दिली आहे.
- रोहित दिवसे, सहायक पोलिस निरीक्षक.
-------------------
शेतमाल वाहतुकीस जाणीवपूर्वक अडथळा करणाऱ्यावर फौजदारी कारवाईची तरतूद असल्याची कल्पना संबंधितांना दिली आहे. त्यानंतर त्यांनी ऊस वाहतुकीस कबुलीही दिली; परंतु पुन्हा अडवणूक झाल्याने पोलिस बंदोबस्ताचे आदेश दिले आहेत.
- दिनेश पारगे, तहसीलदार.