
तिसऱ्या यादीत समावेशाची चिंता
तिसऱ्या यादीत समावेशाची चिंता
---
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; जाचक अटींमुळे वंचित
इचलकरंजी, ता. १७ : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्यासंदर्भात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ही मंजूर केली. मात्र, शासनाच्या जाचक अटींमुळे या प्रोत्साहन अनुदानापासून पहिल्या दोन यादीत नावे न आलेले शेतकरी वंचित राहणार का, अशी भीती निर्माण झाली आहे. किमान तिसऱ्या यादीत तरी आपला समावेश होणार का? याची चिंता या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
पहिल्या व दुसऱ्या यादीत नावे आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत. मात्र, अद्याप नावे प्रसिद्ध न झालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ते शेतकरी अद्याप लाभापासून वंचित आहेत. यात अधिकतर सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या आर्थिक वर्षात वितरित पीक कर्जापैकी ज्या शेतकऱ्यांनी या तीनपैकी एक किंवा दोन वर्षांमध्ये पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड केली असेल, ती पात्र असतील, असे परिपत्रकात म्हटले आहे. ज्यांनी तीनपैकी दोन वर्षांत पीक कर्जाची उचल केली व वेळेत परतफेड केली, त्यांचीच नावे पहिल्या व दुसऱ्या यादीत प्रसिद्ध झाली आहेत. मात्र, परिपत्रकाप्रमाणे तीनपैकी एका वर्षात पीककर्जाची उचल व परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची नावे वगळली आहेत. तसेच, शासनाने आर्थिक वर्ष मार्चअखेर धरले आहे. मात्र, प्रत्यक्ष वस्तुस्थिती अशी असते, की सेवा सोसायटी, सेवा संस्था या ऊस पिकालाच पीककर्ज देतात व ऊस पिकाची साधारणपणे जुलै ते डिसेंबरमध्ये लावणी होते. त्यानंतर शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध होते. तसेच, अनेक शेतकऱ्यांची उसाची तोड ही साधारणपणे फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्येही होते व त्याचे बिल एप्रिल, मेमध्ये जमा होते. त्यानंतर पीककर्जाची परतफेड केली जाते. आर्थिक वर्षानंतर परतफेड झालेल्या शेतकऱ्यांची नावे ही अद्याप या दोन याद्यांत प्रसिद्ध झाली नाहीत. यामुळे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने सरसकट कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही पात्र धरून पुढील तिसऱ्या यादीत सर्वांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.