
‘भाजप’च्या पाठीशी कोल्हापूर असल्याचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचवूया
83459
.........
कोल्हापूर भाजपच्या पाठीशी
असल्याचा संदेश देऊया
---
खासदार धनंजय महाडिक; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी नियोजन बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ ः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापुरात येत असून, तो आपल्या सर्वांसाठी भाग्याचा दिवस आहे. त्यांचा दौरा यशस्वी करून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी कोल्हापूर असल्याचा संदेश दिल्लीपर्यंत पोचवूया’, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी आज येथे केले.
केंद्रीय मंत्री शहा यांच्या रविवारच्या कोल्हापूर दौऱ्याच्या नियोजनासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, भगवान काटे प्रमुख उपस्थित होते.
खासदार महाडिक म्हणाले, की पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने गेल्या वर्षीपासून सुरू केली. सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे देश, राज्य आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. आगामी निवडणुकांमध्ये ताकदीने उतरून आपल्याला चांगले यश मिळवायचे आहे. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाची शिदोरी आपल्यासाठी महत्त्वाची ठरेल. ते लक्षात घेऊन रविवारच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून दौरा यशस्वी करूया. या बैठकीत विजय जाधव यांनी दौऱ्याची माहिती आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची माहिती दिली. अजित ठाणेकर, किरण नकाते, आशिष कपडेकर यांनी पार्किंग, नियोजनाबाबत सूचना केल्या. या वेळी विलास वास्कर, हंबीरराव पाटील, विजय खाडे, माधुरी नकाते, गायत्री राऊत, रूपाराणी निकम, सीमा कदम, विद्या पाटील, मंगला निप्पाणीकर, प्रमोदिनी हर्डीकर, संदीप देसाई आदी उपस्थित होते. अशोक देसाई यांनी आभार मानले.
...
पक्षाच्या आदेशानुसार काम करणार
कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार काम करणार आहे. पक्ष सांगेल, त्या उमेदवारांच्या विजयाचे लक्ष्य ठेवून काम करणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.