लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लेख
लेख

लेख

sakal_logo
By

डॉ. संजय डी. पाटील ः ‘मास्टर ऑफ ऑल फिल्डस्‌’

वारसा हक्काने जरी संधी मिळाली, तरी कर्तृत्व सिद्ध करावेच लागते. डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना संधी मिळाली आणि कष्टातून सचोटीने, संयमाने कर्तृत्व सिद्धही केले आहे. आज त्यांचा वाढदिवस असून, यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा...

- प्राचार्य डॉ. महादेव नरके

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील तथा दादासाहेब यांनी १९८४ मध्ये डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि काही काळ या सर्व संस्थांचे काम पाहिल्यानंतर १८ व्या वर्षी डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली. पहिल्यांदा शेतातील विहिरीच्या बांधकामाची आणि त्यानंतर कसबा बावडा येथील इंजिनिअरिंग कॉलेज बांधकामाची जबाबदारी सोपवली आणि ती त्यांनी यशस्वीपणे पेलली.
एखादे काम हाती घेतले की, त्याचा सखोल अभ्यास करायचा आणि कितीही कष्ट करावे लागले तरी ती गोष्ट पूर्ण करायची, अशाप्रकारे कामाची पद्धत डॉ. संजय पाटील यांची आहे. एखादी व्यक्ती कोणत्यातरी एका क्षेत्रामध्ये पारंगत होऊ शकते; पण डॉ. संजय डी. पाटील यांचा आवाका पाहिला, त्यांनी विविध क्षेत्रांत केलेले नेत्रदीपक काम पाहिले, तर त्यांना ‘मास्टर ऑफ ऑल फिल्डस्‌’ असे म्हणावे वाटते.
डॉ. संजय पाटील यांना पहिल्यापासूनच शिक्षण आणि बांधकामाची प्रचंड आवड. शेतीच्या आवडीतूनच त्यांनी तळसंदे येथील फोंड्या माळावर पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीची कास धरणारा शेती फार्म तयार केला आहे.
ही शेती घेतली त्यावेळी केवळ एक आंब्याचे झाड होते आणि आज हजारो झाडे येथे डोलताना दिसतात. अनेक शिक्षण संकुलेही त्यांनी उभी केली आहेत. या ठिकाणी नव्याने सुरू केलेली डी. वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी ही कृषी आणि अनेक क्षेत्रांतील संशोधनासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
ही एका रात्रीतली जादू नाही, तर त्यांनी कित्येक वर्षे कामात ठेवलेले सातत्य आणि या शेतीवर केलेले प्रेम यामुळेच कित्येक वर्षांनंतर मिळालेले हे फळ आहे.
शिक्षण संस्थेचा व्याप सांभाळत असताना ग्रुपमध्ये कुठे ना कुठे बांधकाम हे सुरू असलेच पाहिजे, अशी त्यांची अलिखित कामाची पद्धत आहे.
कोणत्या बांधकाम साइटवर ते केव्हा पाहणी करायला येतील, याची कोणाला माहिती नसते.
कोल्हापुरातून बाहेर महत्त्वाच्या कामासाठी जाताना कसबा बावडा येथील दत्त महाराजांचे मनोभावे दर्शन ते घेतात. एखाद्या दिवशी मुंबई पुणेवरून रात्री किती उशिरा आले, तर बांधकामाच्या साईटवर जाऊन दहा-पंधरा मिनिटांचा का होईना राउंड घेऊनच ते घरी जतात. एखाद्या तज्ज्ञ इंजिनिअरला किंवा आर्किटेक्टला मागे टाकेल, असे त्यांचे त्या क्षेत्रामध्ये ज्ञान आहे. आणि त्यामुळेच त्यांनी ही सर्व दिमाखदार शैक्षणिक संकुले कष्टाने उभी केली आहेत. कोल्हापूरमध्ये सयाजी हॉटेल असेल किंवा डीवायपी सिटी मॉल असेल याची उभारणी करून कोल्हापूर शहराच्या विकासासाठी त्यांनी योगदान दिले आहे.
इस्रायल येथील शेती आणि जनावरांचा मुक्त गोठा पाहिल्यानंतर अशाच प्रकारचा मुक्त गोठा तळसंदे फार्ममध्ये उभा करण्याचा विचार केला. आणि एक अप्रतिम मुक्त गोठा तळसंदे फार्ममध्ये साकारला आहे.
त्यांच्या या वाटचालीमध्ये श्री दत्तगुरू आणि शेगावचे गजानन महाराज, तसेच दादासाहेब आणि आई सौ. शांतादेवी पाटील यांचे आशीर्वाद महत्त्वाचे ठरले आहेत.
त्यांना पत्नी सौ. वैजयंती पाटील यांची भक्कम साथ लाभली आहे. छोटे बंधू आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, सुपुत्र आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये पडद्यामागे त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचे कनिष्ठ सुपुत्र पृथ्वीराज पाटील यांना शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवरही काम करण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. शिक्षण, कृषी, सहकार, बांधकाम, हॉस्पिटॅलिटी, रुग्णसेवा असे सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले काम थक्क करून सोडणारे व प्रेरणा देणारे आहे.