
सोने तीन हजारांनी उतरले
सोने तीन, तर चांदी पाच हजारांनी उतरली
ग्राहकांना दिलासा ः डॉलरचा दर कमी झाल्याचा परिणाम
कोल्हापूर, ता. १७ ः जागतिक पातळीवर सोने डॉलरचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे आज सोने प्रतितोळा तीन हजार, तर चांदी प्रतिकिलो पाच हजार रुपयांनी उतरली आहे. दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने १ फेब्रुवारी रोजी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीचे दर वाढणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जीएसटी सोडून सोने प्रति तोळा ५९ हजार रुपये, तर चांदी प्रतिकिलो ७० हजार रुपयांवर पोहोचली. अचानक दर वाढल्याने सोने-चांदी खरेदीसाठीची ग्राहकांची पावले थांबली. मात्र, सोने डॉलरचा दर १९५० रुपयांवरून १८२५ रुपयांवर आला. त्याचा परिणाम सोन्याचे दर कमी झाले आहेत. आता सोने प्रतितोळा ५६ हजार १०० रुपये, तर चांदी प्रतिकिलो ६४ हजार ७०० रुपये झाली आहे. याबाबत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड म्हणाले, ‘सोन्याच्या डॉलरचे दर कमी झाल्याने सोने आणि चांदीचे दर उतरले आहेत. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामध्ये सोने, चांदीचे दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळण्यासह खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.’