शेट्टी-पवार प्रेस - सांगली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेट्टी-पवार प्रेस - सांगली
शेट्टी-पवार प्रेस - सांगली

शेट्टी-पवार प्रेस - सांगली

sakal_logo
By

ऊस वाहतूकदारांची २ वर्षांत
एक हजार कोटींची फसवणूक

राजू शेट्टी, पृथीराज पवार ः केंद्र, राज्य सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे

सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. १८ ः गेल्या दोन वर्षांत मुकादमांनी राज्यातील ऊस वाहतूकदारांची एक हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यातून दोन खून, दहा आत्महत्या झाल्या. १० हजार मुकादमांनी वाहतूकदारांना टोपी घातली असून ते आता महागडी वाहने घेऊन रुबाबात फिरतात. यात केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावे. गोपीनाथ मुंडे ऊस तोडकरी कल्याण महामंडळाने तोडणी मजूर पुरवठा करण्याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी आरपारची लढाई आम्ही सुरू करतोय, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी आणि भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, ‘‘ऊस वाहतूकदार ही शेतकऱ्यांची मुले आहेत. सोने, घर, शेतीवर कर्ज काढून त्यांनी वाहने घेतली. मुकादमांना ॲडव्हन्स रक्कम दिली. त्यांनीच फसवणूक केली. त्यांच्याकडे वसुलीला गेल्यानंतर ॲट्रॉसिटी, विनयभंग, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल केले जातात. लाखो रुपये बुडाल्याने वाहतूकदार देशोधडीला लागले. साखर आयुक्तालयाच्या माहितीनुसार राज्यातील १० हजार २५८ मुकादमांनी फसवणूक केली आहे. ही रक्कम आमच्या हिशेबाने एक हजार कोटींवर आहे. साखर उद्योगात ऊस वाहतूकदारांना कसलेही संरक्षण नाही. ऊस तोडकरी महामंडळ काय करते? केवळ कार्यकर्त्याचे पुनर्वसन करायला महामंडळ आहे. त्यांनी तोडणी टोळ्या पुरवल्या पाहिजेत. मुकादम व्यवस्थाच मोडीत काढायला हवी. त्यांना १९ टक्के, म्हणजे टनामागे ५२ रुपये का द्यायचे ? त्याऐवजी महामंडळाला आम्ही दहा रुपये द्यायला आम्ही आनंदाने होकार देऊ. ही रक्कम १३२ कोटी होते. त्यातून महामंडळ सक्षम होईल, तोडकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवता येईल.’’
ते म्हणाले, ‘‘ऊस वाहतूकदारांच्या कर्जाच्या वसुलीसाठी बँकांनी तूर्त तगादा लावू नये, जे फसवले गेले आहेत, त्यांची कर्जे रुपांतरित करून त्यांना पाच वर्षे मुदत द्यावी, फसवणाऱ्या मुकादमांना काळ्या यादीत टाकावे, पोलिस पथक नेमून या प्रकारांची चौकशी करावी, अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही लढा उभा करतोय. त्यासाठी स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटना स्थापन केली आहे. सरकारला आम्ही पंधरा दिवसांची मुदत देतोय, या काळात या विषयावर चर्चा सुरू कराव्यात.’’
स्वाभिमानीचे महेश खराडे, संदीप राजोबा, सूर्यकांत मोरे, धन्यकुमार पाटील, जगन्नाथ भोसले, भरत साजणे, संजय बेले, प्रवीण शेट्टी, युवराज माळी, तानाजी पाटील, विठ्ठल पाटील, संदीप मगदूम आदी उपस्थित होते.

चौकट ः
बुधवारी चक्काजाम
वीज दरवाढीच्या विरोधात बुधवारी (ता. २२) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन पुकारले. राजू शेट्टी म्हणाले, ‘‘३७ टक्के वीज दरवाढ लादली जात आहे. त्याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांना तुम्ही दिवसा वीज देत नाही. वीज व्यवस्थापन नीट करत नाही. बंद पंपांचे पैसे वसूल करता, सरकारचे अनुदान लाटता, हे सिद्ध झाले आहे. या सगळ्याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. बारावी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेऊ.’’