‘या जन्मावर...या जगण्यावर...’ मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘या जन्मावर...या जगण्यावर...’ मालिका
‘या जन्मावर...या जगण्यावर...’ मालिका

‘या जन्मावर...या जगण्यावर...’ मालिका

sakal_logo
By

मालिका लोगो-
या जगण्यावर...
शतदा प्रेम करावे ः भाग १

मुख्य लीड
गायक अरुण दाते यांच्या ‘या जन्मावर.. या जगण्यावर... शतदा प्रेम करावे...’ या गीताचे बोल पुन्हा पुन्हा बालमनावर, तरुणांवर, वृद्धांवर बिंबवण्याची गरज आहे. कारण अल्पवयीन मुलांसह तरुण आणि वृद्धांत आत्महत्या करणे, आत्महत्येचे प्रयत्न करण्याचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या संकटाला सामोरे जाण्याची, त्याच्याशी दोन हात करण्याची जिद्द, चिकाटी अपुरी पडत आहे. त्यामुळेच हाताश होऊन आत्महत्येकडे झुकत आहेत. यावर दृष्टिक्षेप टाकणारी मालिका आजपासून...
......
वेळीच मिळाले समुपदेशन, तर संपणार नाही जीवन
आत्महत्या वा आत्महत्येच्या प्रयत्नांतील वाढ चिंताजनक

लुमाकांत नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ ः तिला दहावीत ९३ टक्के गुण. ग्रामीण डोंगरी भागात पुढील शिक्षणासाठी अडचणी नको म्‍हणून तिला कोल्हापुरात ठेवले. अल्पवयीन असल्यामुळे अल्लड मनावर तरुण्याची भुरळ पडली आणि प्रेमात अडकली. राहत असलेल्या ठिकाणी तरुणाचा वावर वाढला आणि एके दिवशी राहत असलेले ठिकाण सोडावे लागले. आपण हुशार... म्हणून कुटुंबीयांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापुरात पाठविले आता हे काय होऊन बसले. कुटुंबीयांना तोंड कसे दाखवायचे, या निराशेने तिने थेट शेतीमाल दुकानातून कीटकनाशक घेतले आणि प्यायले. दुसऱ्या दिवशी तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील ही एक सत्य घटना आहे. मुलीच्या अल्लडपणामुळे तिच्या कुटुंबीयांच्या आशेवर पाणी फेरले. तिच्या एका चुकीमुळे लख्ख असलेले भविष्य वर्तमानातच अंधारमय झाले. काय चुकले त्या आई वडिलांचे, मुलगी शिकून मोठी होईल म्हणून शहरात पाठविले; पण तिच्या काही चुकांमुळे जीवन संपविण्यापर्यंतचा निर्णय तिने घेतला. एक चूक दुरुस्त झाली असती. त्यातून बाहेर पडणेही शक्य होते. वेळीच समुपदेशनाची गरज होती. थोरा-मोठ्यांच्या मार्गदर्शनाची गरज होती. वेळीच ते मिळाले असते तर आज ही मुलगी जगली असती.
अलीकडेच आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसांगणिक वाढत आहे. ‘सीपीआर’मध्ये एकाच दिवशी सहा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची आकडेवारी पाहता खरंच कुठंतरी काही तरी चुकतंय असेच वाटते. यावर वेळीच प्रबोधन न झाल्यास अनेक कुटुंबीय केवळ निराशेच्या खाईत जातील.
कोणी खाऊसाठी पैसे दिले नाहीत म्हणून, कोणी मोबाईल दिला नाही म्हणून, तर काही वेळा आई-वडिलांनी रागावले म्हणून आत्महत्येचे प्रयत्न होताना दिसत आहेत. यावर वेळीच समुपदेशनाचा मार्ग अवलंबल्यास काही प्रमाणात या आत्महत्या किंवा आत्महत्येचे प्रयत्न रोखले जातील.

चौकट
संकटांना सामोरे जाण्याची द्यावी शिकवण
शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे याठिकाणी याबाबत प्रबोधन झाले पाहिजे. जीवन सुंदर आहे, जगायला शिका, संकटे येणारच आहेत, त्याला सामोरे जायला शिका. याची शिकवण बालवयातच दिली पाहिजे. अन्यथा एक एक जीव असाच गळफासाच्या दोरीने, कीटकनाशकाने संपून जाईल. यामुळे अख्ख कुटुंब निराशेच्या खाईत खचून जाईल.