
लम्पी बाधित ९३ टक्के जनावरे बरी
जिल्हा परिषद
लम्पी बाधित ९३ टक्के जनावरे बरी
६ टक्के जनावरांचा मृत्यू; बाधिताचे प्रमाण झाले कमी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : मागील सात, आठ महिन्यांपासून जिल्ह्यात लम्पी आजाराने थैमान घातले. यामध्ये गायवर्गीय जनावरे जसे की गाय, बैल व वासरू मोठ्या प्रमाणात बाधित झाली. आज अखेर १७ हजार ५०४ जनावरांना लम्पी या चर्मरोगाची बाधा झाली. मात्र यातील ९३ टक्के जनावरांचा हा आजार बरा झाला आहे. केवळ सहा टक्के जनावरे यात मृत्युमुखी पडली आहेत.
लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने लसीकरणास सुरुवात केली. जिल्ह्यातील दोन लाख ५७ हजार २६८ गायी, २९ हजार १३५ बैल, तर एक हजार ५६० वासरांचे असे एकूण दोन लाख ८७ हजार ९६३ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आजअखेर १७ हजार ५०४ जनावरे या आजाराने बाधित झाली. यातील १६ हजार २९१ जनावरे रोगमुक्त झाली. या आजारात आत्तापर्यंत एक हजार ९४ जनावरे दगावली आहेत. यातील ८६८ जनावरांच्या नुकसान भरपाईसाठी अर्ज प्राप्त झाले होते. त्यांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. तर अजून २२६ अर्ज प्रलंबित आहेत. प्रस्तावातील त्रुटी पूर्तता झाल्यानंतर संबंधित पशुपालकांना अनुदान दिले जाणार आहे.
----------
कोट
जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांना लम्पीची लागण झाली. यामुळे सरासरी सुमारे एक लाख लिटर दुधाच्या उत्पादनाला फटका बसला. तत्काळ लसीकरण केल्याने हा आजार नियंत्रणात आला आहे. सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच एकही लम्पीची लागण झालेले जनावर आढळलेले नाही. ही देखील समाधानाची बाब आहे. असे असले तरीही पशुवैद्यकीय सेवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लम्पीवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
- डॉ. विनोद पवार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी