
शिवजयंती लेख
मराठी भाषेच्या वैभवाचे जनक
छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज रचनात्मक प्रतिभावंत राजे होते. त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, कन्नड, फारशी व ऊर्दू अवगत होत्या. त्यांच्या कालखंडातच साहित्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला. महाराजांनी स्वतः लिखाण केले होते. तंजावरमधील सरस्वती महालात त्यांच्या हस्ताक्षरातील अभंग उपलब्ध आहेत. त्यांनी मराठी भाषा वैभवाचा पाया घातला. मराठीला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून देण्याचे महान कार्य केले. राजशक सुरू करून मराठीतून राजव्यवहार सुरू केला.
---------------
छत्रपती शिवाजी महाराजांनी विद्या आणि कलेला नेहमीच प्रोत्साहन दिले. १६७३ मध्ये महाडजवळील पोलादपूरमध्ये वास्तव्यास असताना पाठशाळा व शिक्षकमंडळींची भेट घेऊन शिक्षण विषयक कार्यपद्धतीची केलेली विचारपूस महत्त्वाची मानली जाते. इंग्रजी भाषिक टॉमस निकल्सन, हेन्री ऑक्सिडन, हेन्री रेकिंग्टन, ऑस्टीन आदींसोबत दुभाषक नारायण शेणवी यांच्या मध्यस्थीने केलेले संभाषण श्रेष्ठ असेच आहे. मराठशाहीतील ऐतिहासिक गद्य या बहुमोल मराठी अलंकाराची उभारणी शिवाजी महाराजांनी केली. स्वराज्यात सर्वसामान्य लोकांच्या शिक्षणाची व्यवस्था झालेली होती. सर्व जातीधर्मातील लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार प्राप्त झाला होता.
स्वराज्यात राजशक सुरू झाल्यानंतर हिंदू महिना, तिथी यांचा सर्रास वापर होऊ लागला. यातून मराठी, संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड हा बौद्धिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यावेळी राज्यकारभाराची भाषा फारसी होती. परंतु, लोकांना फारशी समजत नव्हती. त्यासाठी महाराजांनी राज्यभाषा कोश तयार केला. मराठी व संस्कृत भाषेला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी राज्य व्यवहारकोष या श्रेष्ठ ग्रंथाची निर्मिती करून घेतली. हा ग्रंथ रघुनाथ हणमंते व अन्य विद्वानांच्या मदतीने १६७८ मध्ये तयार केला. पुढे संस्कृत व मराठी भाषांमध्ये राजव्यवहार सुरू केला. त्यांनी मराठीला आपली राजभाषा म्हणून घोषित केले. दरबारातील लिखाण मराठी भाषेत लिहिण्याचा क्रम छत्रपती शिवाजी महाराजांनींच सुरुरू केला. कर्नाटक मोहिमेवेळी त्या प्रदेशातील प्रशासन संघटित करण्यासाठी महाराज वीस हजार कारकून घेऊन गेले होते. ते सर्व मराठीतून लिखाण करीत असत.
ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी साहित्य क्षेत्रात प्रवृत्त केले. त्यानंतर संभाजी महाराजांनी बुद्धभूषणम्, नायिकाभेद, नखाशिख, सातसतक या उत्कृष्ट ग्रंथाची निर्मिती केली. छत्रपतींनी छपाईचे यंत्रही भिमाजी पारेखच्या माध्यमातून मिळविले होते. १९४२ मध्ये मुंबईत भरलेल्या पाचव्या ग्रंथालय परिषदेत अध्यक्ष कन्हैयालाल मुन्शी यांनी याबाबत जाहीरपणे सांगितले होते. देशातील या एकाच राजाने छपाईकलेची माहिती जाणून मराठी भाषेला वैभव प्राप्त करून दिले.