बाल नाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाल नाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा
बाल नाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा

बाल नाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा

sakal_logo
By

KOP23L83928

बेळगाव : येथे रविवारी बालनाट्य संमेलनाच्या समारोप समारंभात संवाद साधताना अभिनेते सुबोध भावे. शेजारी संध्या देशपांडे, मीना नाईक, वीणा लोकूर, प्रसाद पंडित, सई लोकूर, देवदत्त पाठक.

बाल नाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा
---
सुबोध भावे; चांगले लेखक घडणेही तितकेच महत्त्वाचे
सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. १९ : संगीत नाटकाची सुरुवात बेळगावातून झाली आणि त्यानंतर संगीत नाटक सर्वदूर पसरले. त्याचप्रमाणे पहिल्या बालनाट्य संमेलनातून बालकलाकार निर्माण होऊन बालनाट्य चळवळीचा वटवृक्ष व्हावा, असे प्रतिपादन अभिनेते सुबोध भावे यांनी आज केले.
मुंबई येथील बाल रंगभूमी अभियानातर्फे संत मीरा शाळेच्या सभागृहात आयोजित पहिल्या बालनाट्य संमेलनाचा समारोप झाला. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘बेळगाव, कोल्हापूर, सांगली या भागाने संगीत, नाट्य क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. १८८० मध्ये सरस्वती वाचनालयातून पहिल्या संगीत नाटकाची सुरुवात झाली होती आणि त्यानंतर विविध संगीत नाटके निर्माण होण्यास सुरुवात झाली. पहिल्या बालनाट्याच्या माध्यमातून एक व्यासपीठ मिळाले असून, लहान मुलांच्या कलेतील जडणघडणीकडे लक्ष दिले पाहिजे. लहान मुलांकडून अधिक अपेक्षा बाळगू नका. नाटकातून सर्वजण एकत्र येतात. संघभावना निर्माण होते. मंदिराइतकीच रंगभूमी पवित्र असून, बॅक स्टेजवरच्या कलाकारांचेही महत्त्व असते.’’
ते म्हणाले, ‘‘सध्या लहान मुलांसाठी चित्रपट बनत नाही. बालनाट्ये निर्माण झाली पाहिजेत. बालनाट्य लिहिणारे चांगले लेखक झाले पाहिजेत. पूर्वी गावोगावी एकांकिका होत होत्या. सध्या मात्र प्रमाण खूपच कमी झाले असून, शाळांमध्ये नाटक व कलेसाठी तास राखून ठेवला पाहिजे. बालनाट्य चळवळ बनली पाहिजे.’’
अभिनेते प्रसाद पंडित यांनीही मार्गदर्शन केले. बाल रंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी भावे व पंडित यांचा सन्मान केला. या वेळी व्यासपीठावर अभिनेत्री सई लोकूर, संमेलनाध्यक्षा मीना नाईक, देवदत्त पाठक, संध्या देशपांडे उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात ३०० विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली. पुणे येथील नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे संध्या कुलकर्णी लिखित जीर्णोद्धार बालनाट्य तसेच बालरंगभूमी अभियानातर्फे नयना डोळस लिखित ‘माजी माय’ हे बालनाट्य सादर करण्यात आले.
करमणूक करामुळे बेळगावात मराठी नाटकांचे प्रयोग कमी झाले आहेत. मराठी नाटकांवरील जकात कर कमी करावा, यासाठी मी महाराष्ट्रातील मंत्र्यांशी चर्चा केली. मात्र, कर रद्द करण्याबाबत पुढे काहीच झाले नाही. त्यातच बालनाट्यांना सरकारचे सहाय्य मिळत नाही. याचा विचार केल्यास सरकारचे सांस्कृतिक धोरण उदासीन असल्याचे दिसून येते, असेही सुबोध भावे पत्रकारांना म्हणाले. ते म्हणाले, ‘‘सरकारचे सांस्कृतिक धोरण उदासीन आहे. सांस्कृतिक विभाग किंवा शासनाच्या सहकार्याविना नाट्य चळवळ यशस्वी होऊ शकते.’’
ते म्हणाले, ‘‘बालनाट्याची सुंदर परंपरा लुप्त झाली आहे. मुलांसाठी आपण आता काहीच करताना दिसत नाही. मोबाईलमध्ये अडकलेल्या मुलांना सकस मनोरंजन देणे आवश्यक आहे. खेळण्या, बागडण्याच्या वयात मुलांना जास्त शहाणपण शिकविले जाऊ नये. त्यांना दंगामस्ती करू द्यावी. त्यांना जे जे सुचतं, ते ते करू द्यावं.’’