रखरखत्या उन्‍हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रखरखत्या उन्‍हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक
रखरखत्या उन्‍हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक

रखरखत्या उन्‍हात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक

sakal_logo
By

84119, 84117
....

कोल्हापूर : अंगणवाडी विविध महिला कर्मचारी संघटनांनी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भाकप अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि अंगणवाडी कर्मचारी युनियनतर्फे काढलेला मोर्चा. दुसऱ्या छायाचित्रात
माकपतर्फे काढलेल्या मोर्चात सहभागी अंगणवाडी कर्मचारी. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )
...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची झेडपीवर धडक

दोन्‍ही गेटवर दोन संघटना आक्रमक; कर्मचारी युनियन, कृती समितीचा बेमुदत संप

सकाळ वृत्तसेवा

कोल्‍हापूर, ता. २० : दुपारच्या उन्‍हाचा जोरदार तडाखा, घामांच्या धारा आणि मागण्यांचा नारा देत सोमवारी (ता. २०) अंगणवाडी कर्मचाऱ्यां‍नी जिल्‍हा परिषदेवर धडक दिली. आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणा देत जिल्हा परिषदेचा परिसर हादरवून सोडला. कर्मचारी युनियन तसेच कृती समिती या दोन्‍ही संघटनांनी जिल्‍हा परिषदेच्या दोन्‍ही गेटवर धरणे आंदोलन करत बेमुदत संप जाहीर केला.

जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समिती या दोन संघटनांच्या अंगणवाडी सेविकांनी महावीर गार्डनपासून मोर्चा काढत राज्य शासनाचा निषेध केला. दुपारच्या रखरखत्या उन्हातही अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांबाबत जिल्हा परिषदेच्या दारातच ठिय्या मांडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार नाही, असा पवित्रा सेविकांनी घेतला होता. या आंदोलनासह आजपासून बेमुदत संपावर जात असल्याचे निवेदन एकात्मिक बालकल्याण व महिला विकासच्या अधिकारी शिल्पा पाटील यांच्याकडे संघटनांकडून देण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. यात समायोजन पूर्णपणे रद्द करवून घेणे, पटसंख्या कमी असल्याच्या नावाखाली अंगणवाड्या बंद करण्याचा शासनाचा विचार मागे घ्यायला लावणे, मदतनीस, सेविका व मुख्य सेविकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीला प्राधान्य देणे, सेवासमाप्ती लाभात भरीव वाढ करावी, सेवाज्येष्ठता, पदोन्नती व सेवासमाप्ती लाभ इत्यादींसाठी पदोन्नत सेविकांची मदतनीस म्हणून झालेली सेवा ग्राह्य धरावी, दिवाळीला तुटपुंजी भाऊबीज न देता एका महिन्याच्या मानधनाइतका बोनस द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. शासनाकडून वारंवार मागण्यांबाबत फसवणूक होत असल्यानेच आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे कृती समितीने तसेच कर्मचारी युनियनकडून सांगण्यात आले.

नुकतीच केंद्रीय मानधनवाढ जाहीर झालेली असली तरी त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही. केंद्र आणि राज्याच्या कात्रीत सापडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भूमिका यावेळी युनियनचे कॉ. आप्पा पाटील तसेच कृती समितीचे कॉ. अतुल दिघे यांनी मांडली. कॉ. सतीशचंद्र कांबळे, कॉ. रघुनाथ कांबळे यांच्यासह या आंदोलनात युनियनच्या वतीने कॉ. रेश्मा भंडारे, मंगल माळी, विद्या कांबळे, दिलशाद नदाफ, अंजली क्षीरसागर, मंगल गायकावाड यांनी, तर कृती समितीतर्फे सुवर्णा तळेकर, धोंडीबा कुंभार, लता कदम, जुलेखा मुल्लाणी, उषा कडोकर, आक्काताई उदगावे, रेखा चौगले यांनी सहभाग घेतला.