विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा संप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा संप
विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा संप

विद्यापीठात कर्मचाऱ्यांचा संप

sakal_logo
By

84181
...

विद्यापीठासह महाविद्यालयातील
कर्मचारी बेमुदत संपावर

प्रशासकीय कामकाज ठप्प : जिल्ह्यातील १२१ महाविद्यालये सहभागी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० ः महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आजपासून त्यांनी विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सर्व प्रशासकीय कामकाजावर बहिष्कार टाकला. विद्यापीठात कर्मचाऱ्यांनी मुख्य इमारतीला चालत वेढा मारून आपला निषेध नोंदवला. तसेच ग्रंथालयासमोरील पाणपोईसमोर सर्वांनी एकत्र येऊन आपल्या मागण्यांचा पुनर्रुच्चार केला. जिल्ह्यातील १२१ महाविद्यालयातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आजपासून प्रशासकीय कामकाज ठप्प राहणार आहे.
सोमवारी सकाळी विद्यापीठातील सर्व कर्मचारी प्रांगणात एकत्र आले. त्यांनी मुख्य इमारतीला चालत फेरी मारून राज्य शासनाच्या भूमिकेचा निषेध केला. त्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रंथालयासमोरील पाणपोईसमोर सर्वांना मार्गदर्शन केले. या वेळी विद्यापीठ सेवक संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले, ‘‘चर्चेत ठरल्यानुसार पत्रातील कोणतीही मागणी मान्य झाल्याची इतिवृत्तात नोंद नाही. तसेच प्रत्येक मागणीबाबत विभागाकडून करण्यात येणाऱ्या निश्चित कार्यवाहीबाबत हवी असलेली स्पष्टता, विहित कालावधी, तप्तरता व संबंधित विभागाची जबाबदारी याबद्दल संदिग्धता या इतिवृत्तांतात दिसून येतात. या बैठकीत मुख्यमंत्री, अर्थमंत्री व सेवक संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर केलेल्या चर्चेवर समिती समाधानी व सहमत होती. परंतु इतिवृत्तांतात घेतलेल्या नोंदी या चर्चेशी विसंगत असल्याचे दिसून येतात. याबाबत १७ फेब्रुवारीला समिती पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. जोपर्यंत इतिवृत्तात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.’’ या संपात सांगली जिल्ह्यातील ८४ आणि सातारा जिल्ह्यातील ७४ महाविद्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या वेळी कृती समितीचे मुख्य संघटक आनंद खामकर, विद्यापीठ सेवक संघाचे उपाध्यक्ष संजय पोवार, सरचिटणीस राम तुपे, खजानिस अनिल पाटील यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------

कामकाजावर मोठा परिणाम
दरम्यान, आंदोलनामुळे आज राज्यातील अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील कामकाजावर मोठा परिणाम झाला. प्रशासनाकडून आमच्या मागण्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात चलढकलपणा केला जात आहे. त्यामुळे आम्हाला नाईलाज म्हणून हे आंदोलन बेमुदत सुरू करावे लागले असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.