जीर्ण जलवाहिनी बदलण्यास गती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीर्ण जलवाहिनी बदलण्यास गती
जीर्ण जलवाहिनी बदलण्यास गती

जीर्ण जलवाहिनी बदलण्यास गती

sakal_logo
By

ich2011.jpg
84199
इचलकरंजी ः शिरढोणजवळील गळती लागल्याने जीर्ण जलवाहिनी बदलण्याच्या कामास सोमवारी प्रारंभ झाला. या वेळी इंजिनच्या सहाय्याने साचलेले पाणी बाहेर काढण्यात आले.
--------
जीर्ण जलवाहिनी बदलण्यास गती
---
कृष्णा योजना गळती; इचलकरंजीत आठवडाभरानंतर होणार पाणीपुरवठा सुरळीत
इचलकरंजी, ता. २० ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेची गळती लागलेली जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू झाले. हे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. तूर्तास पंचगंगा नदीतून तहान भागविण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. पंचगंगा योजनेतून होणारा उपसा कमी असल्याने नागरिकांना चार ते पाच दिवसांनंतर पाणी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना किमान आठवडाभर तरी पाण्यासाठी वणवण करावी लागेल.
कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोण (ता. शिरोळ) येथे गळती लागली आहे. एकाच परिसरात महिनाभरात चार वेळा गळती लागली. या परिसरातील जलवाहिनी अत्यंत जीर्ण झाल्याने गळतीचे संकट सातत्याने निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून किमान ३० मीटर नवीन जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला. सुदैवाने आज दुपारी एकला मजरेवाडी उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जलवाहिनी बदलण्याच्या कामास सुरुवात केली. येथे जलवाहिनीतील शिल्लक पाणी मोठ्या प्रमाणात साचत राहिले. त्यामुळे तातडीने काम करताना अडथळा निर्माण झाला. सुरुवातीला साचलेले पाणी इंजिनद्वारे बाहेर काढण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यक पूर्वतयारी संबंधित मक्तेदारांकडून करण्यात आली. पुढील दोन दिवस नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम चालण्याची शक्यता आहे. या कालावधीत कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद राहील. त्याचा परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. नेहमीचा आधार ठरलेल्या पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यात येईल. पंचगंगा योजनेचे उपसा केंद्र आणि कट्टीमोळा डोह अशा दोन ठिकाणांहून हा उपसा केला जाणार आहे. यात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा शहरात पुरवठा करण्यात येईल. मात्र, उपलब्ध पाणी अपुरे असणार आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसांनंतर नळाला पाणी येईल. त्यामुळे नागरिकांना किमान आठवडाभर तरी पाण्यासाठी अन्य पर्यायांचा आधार घ्यावा लागणार आहे.
-------------
वीजपुरवठा खंडित होण्याची भीती
कृष्णा योजना बंद असून, पंचगंगा योजनेतून पाणीपुरवठा सुरू आहे. या योजनेचा वीजपुरवठा काही कारणास्तव खंडित झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना शुद्ध पेयजल व कूपनलिकांचा आधार घ्यावा लागेल. तसेच, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महापालिकेकडून ‘महावितरण’कडे विनंती करण्यात आली.