पानसरे सुनावणी- ६ मार्च पासून पुरावे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पानसरे सुनावणी- ६ मार्च पासून पुरावे सुरू
पानसरे सुनावणी- ६ मार्च पासून पुरावे सुरू

पानसरे सुनावणी- ६ मार्च पासून पुरावे सुरू

sakal_logo
By

लोगो- पानसरे हत्या प्रकरण

साक्षीपुराव्यांचे काम ६ मार्चपासून

चार पंचांची नावे सादर; मृतदेह, कपड्यांबाबत साक्ष

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षी-पुरावे तपासण्यास आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी परवानगी दिली. ६ मार्चपासून प्रत्यक्षात साक्षी-पुरावे सुरू होणार आहेत. यासाठी आज विशेष सरकारी वकिलांनी चार पंचांची नावे न्यायालयाकडे दिली आहेत. त्यांना हजर राहण्यासाठी साक्षी समन्स पाठविण्याची विनंती केली आहे.
पानसरे खून खटल्यातील साक्षी-पुरावे तपासण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी आज विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयाकडे केली. यावेळी संशयित आरोपींचे वकील प्रीती पाटील यांनी केस डायरी सादर करावी, तोपर्यंत साक्षी पुरावे सुरू करू नयेत, अशी मागणी न्यायालयाकडे केली. यावेळी निंबाळकर यांनी केस डायरी आम्ही न्यायालयाकडे देत आहोत. त्यासाठी साक्षी-पुरावे थांबविण्याची गरज नाही. तसेच केस डायरी ही केवळ न्यायालयाला पाहता येते. बचाव पक्षाला आणि सरकार पक्षालाही पाहता येत नाही. त्यामुळे ६ मार्चला केस डायरी न्यायालयात हजर करतो, असे सांगितले.
यानंतर निंबाळकर यांनी चार साक्षीदारांची नावे न्यायालयाकडे दिली. हे चार साक्षीदार सरकारी पक्षातर्फे तपासण्यात येणार आहेत. पानसरे यांच्या मृतदेहाचा पंचनामा करणाऱ्या दोन पंचांचा यात समावेश आहे. ते मुंबईचे आहेत. दुसरे म्हणजे पानसरे यांचे कपडे जप्त केले, त्यावर रक्ताचे डाग होते. त्यांच्या अंगावर ज्या काही वस्तू मिळाल्या, त्याचा ही पंचनामा केला आहे. त्याचे दोन पंच, असे एकूण चार पंच ६ मार्चला तपासणार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यांची नावे न्यायालयाला सादर केली. त्यावर साक्षी-पुरावे तपासण्यास आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी परवानगी दिली. यावेळी विशेष सरकारी ॲड. शिवाजीराव राणे, ॲड. विवेक पाटील, ॲड. चेतन शिंदे, कॉम्रेड दिलीप पवार यांच्यासह दहशतवादी विरोधी पथकाचे अधिकारी न्यायालयात उपस्थित होते.
----------
साक्षीदारांना समन्स काढण्याची मागणी आम्ही न्यायालयाकडे केली. तसेच चार साक्षीदारांची नावे संशयित आरोपींच्या वकिलांनाही दिली आहेत. त्यामुळे सहा मार्चपासून साक्षी पुराव्याला सुरुवात होणार आहे.
- हर्षद निंबाळकर, विशेष सरकारी वकील