
गुणवंत गाढव झाले दुर्मिळ
84477
...
गुणवंत गाढव झाले दुर्मिळ
लोकोत्सवात प्रदर्शन : देशात केवळ १ लाख २० हजार गाढवे शिल्लक
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः एखाद्याला हिणवण्यासाठी ‘गाढव’ म्हणून संबोधले जाते; मात्र याच गाढवाचे गुण काय आहेत, हे पाहायचे असेल तर सिद्धगिरी मठावरील सुमंगलम महोत्सवाला भेट द्यावी. येथील प्रदर्शनात गाढवांच्या विविध प्रजाती पाहायला मिळतील आणि त्यांची वैशिष्टेही जाणून घेता येतील.
या महोत्सवात पशुप्रदर्शन भरवण्यात आले. अश्व, श्वान, देशी गाय, बैल, म्हैस, रेडे, मांजरे यांच्या विविध देशी प्रजाती येथे पाहायला मिळतात. विशेष म्हणजे यांची गुणवैशिष्ट्येही येथे देण्यात आली आहेत. प्रदर्शनातील गाढवांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. इथे कच्छी आणि हलारी या दोन प्रजातींची गाढवे पाहायला मिळतात. हलारी ही प्रजाती गुजरातमधील सौराष्ट्र भागातील आहे. त्यांचा रंग पाढंरा असून, नागपुडी आणि खूर काळ्या रंगांचे असते. कपाळ बहिर्वक्र असते. या गाढवांचा स्वभाव नम्र असतो. ते ओझे वाहण्यासाठी उपयोगात येतात. दिवसाकाठी ते ३० ते ४० किलोमीटर प्रवास करतात. कच्छी गाढव हेदेखील गुजरातमधील कच्छच्या प्रदेशात आढळतात. त्यांच्या कातडीचा रंग वैशिष्ट्यपूर्ण आहे. पोटावरील अर्धा भाग राखाडी आणि पोटाखालील अर्धा भाग पांढऱ्या रंगाचा असतो. कपाळ बहिर्वक्र आणि अनुनासिक हाड सरळ असतो. याचा उपयोग शेतीच्या कामासाठी अधिक होतो. तसेच हे गाढव गाडीला जुंपून ओझे वाहून नेण्याचे कामही करतात.
-------
गाढवाची उपयुक्तता
मादी गाढव दिवसाला १ लिटर दूध देते. याची किंमत प्रतिलिटर ७ ते १० हजार रुपये प्रति लिटर आहे. गाढवाच्या दुधाचा उपयोग सौंदर्यप्रसाधने बनवण्यासाठी केला जातो. ज्या लोकांना लॅक्टोजची अलर्जी आहे, त्यांच्यासाठी हे दूध उपयुक्त ठरते. गाढवाच्या दुधातील प्रथिने हे प्रतिजैविक स्वरूपात असतात. त्यामुळे विषाणू आणि जिवांणूमुळे होणारे पोटाचे विकार कमी होतात. या दुधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रक्ताभिसरण चांगले होते. गाढवाचे दूध अपस्मार आणि स्मृतिभ्रंशावर खूप प्रभावी ठरते, अशी माहिती पशुवैद्यक डॉ. पुष्पनाथ चौगले यांनी दिली.
----------
गाढवांची संख्या घटली
सुमंगल महोत्सवातील पशुप्रदर्शनातील फलकांवरील माहितीप्रमाणे देशातील गाढवांची संख्या ६१ टक्क्यांनी कमी झाली आहे. सध्या संपूर्ण भारतात १ लाख २० हजार एवढीच गाढवे शिल्लक आहेत. जिवंत गाढव निर्यात करण्यासाठी बंदी असली तरी मास आणि कातडीची निर्यात केली जाते. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कातडी आणि मास निर्यात होते.