
पंचमहाभूत महोत्सव अमोल कोल्हे बातमी
84491
...
पंचतत्त्वांची संकल्पना वैज्ञानिक
दृष्टिकोनातून मांडणारा महोत्सव
खासदार अमोल कोल्हे ः ‘आकाश तत्त्व’ विषयावर चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ ः ‘सिद्धगिरी मठावरील पंचमहाभूत सुमंगलम् लोकोत्सव हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. या ठिकाणी विविध प्रदर्शनांमधून पंचमहाभूतांची संकल्पना मांडण्यात आली आहे. या आध्यात्मिक संकल्पनेची वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करणारा हा महोत्सव आहे,’ असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. सुमंगलम् महोत्सवातील ‘आकाश तत्त्व’ चर्चासत्रात ते बोलत होते.
महोत्सवातील आज पहिल्या सत्रात ‘आकाश तत्त्व’ या संकल्पनेची मांडणी करण्यात आली. यावेळी डॉ. कोल्हे म्हणाले, ‘पर्यावरण हे केवळ एक शास्त्र नसून, ती एक संकल्पना आहे. पंचमहाभुतांनी हे पर्यावरण बनते. या पाच तत्त्वांचे संवर्धन केल्याशिवाय पर्यावरणीय समस्या सुटणार नाहीत. या पंचतत्त्वांकडे वैज्ञानिकदृष्टीने कसे पाहायचे याची दृष्टी या महोत्सवातून मिळते. तरुणांनी पृथ्वीसारखे सगळ्यांना आधार देणारे, अग्निसारखे तेजस्वी, वायूसारखे प्रवाही, आकाशासारखे सगळ्यांना सामावून घेणारे असे व्यापक व्हावे.’
राजस्थानमधील अभयदासजी महाराज म्हणाले, ‘इथे सहभागी लोक भाग्यवान आहेत की अशा कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना मिळाली. श्री क्षेत्र सिद्धगिरीचे कार्य अद्भुत असून संत काय करू शकतात याची प्रचिती या निमित्ताने येते.’ ‘एनसीएसटी’चे अध्यक्ष हर्ष चौहान म्हणाले, ‘आदिवासींसाठी निसर्ग आणि समाज हे वेगळे नसून ते एकच आहेत. ते कधीही भूमीचे तुकडे पाडत नाहीत. पंचमहाभूतांचे संवर्धन केल्यानेच विश्वाचे कल्याण होणार आहे.’ इस्रोचे शास्त्रज्ञ एस. व्ही. शर्मा म्हणाले, ‘भारताकडे पंचमहाभूतांसारखा वैश्विक विचार आहे. हा विचारच पर्यावरणीय समस्या सोडवू शकणार आहे.’ पेशावर येथील विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘पंचमहाभूतांचे रक्षण करण्याचे दायित्व आपल्यावर आहे. आपण आकाशात अनेक उपग्रह पाठवले; मात्र त्यातील अनेकांचे काम झाल्याने ते आता कचरा म्हणून अवकाशात आहेत. अशा गोष्टींवर आपण योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत.’ यावेळी अक्षय कृषी परिवाराचे डॉ. गजानन डांगे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी उपस्थित होते.
...
नागरिकांनाच पुढाकार घ्यावा
राष्ट्रीय हरित लवादाचे ए. के. गोयल म्हणाले, ‘आज देशातील ६० टक्के लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी नाही. देशात सर्वत्र कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. सरकार काही करेल अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आता नागरिकांनाच पुढाकार घेऊन कृती करावी लागेल.’