शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन
१० मार्चपर्यंत स्थगित

सुधारित इतिवृत्त मिळाल्याने निर्णय; शिवाजी विद्यापीठातील कामकाज आजपासून पूर्ववत सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २१ ः शासनाकडून सुधारित इतिवृत्त मिळाल्याने विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज रात्री स्थगित केले. राज्य सरकारला मागण्यांच्या पूर्ततेसाठी वेळ देण्यासाठी त्यांनी १० मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे सर्व सदस्य कर्मचारी उद्या, बुधवारपासून कामावर रुजू होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार आहे.
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, या चर्चेच्या इतिवृत्तात कोणत्याही मागणीच्या मान्यतेचा उल्लेख नाही. हे इतिवृत्त सकारात्मक नाही. त्यामुळे सोमवार (ता. २०) पासून बेमुदत कामबंद आंदोलन राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्या आदेशानुसार या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरू केले. या समितीला आज दुपारी तीनच्या सुमारास शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार सुधारित इतिवृत्त मिळाले. त्यानंतर रात्री साडेसात ते दहा वाजेपर्यंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. त्यामध्ये १० मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीतील चर्चेत कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख, प्रमुख सल्लागार आर. बी. सिंग, मुख्य संघटक मिलिंद भोसले, आनंद खामकर आदी सहभागी झाले. दरम्यान, बेमुदत कामबंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विद्यापीठातील काम ठप्प झाल्याने शुकशुकाट होता.
...

दोन मागण्यांची मंजुरी अंतिम टप्प्यात

सुधारित सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, ५८ महिन्यांची सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनाच्या फरकाची रक्कम देणे, या दोन मागण्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. त्याबाबत शासनाकडून लवकर आदेश निघेल. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाला कार्यवाही करण्यासाठी वेळ द्या आणि तोपर्यंत आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन समितीला केले होते. सुधारित इतिवृत्त मिळाल्याने समितीने आंदोलन स्थगित केले असल्याचे मुख्य संघटक मिलिंद भोसले यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com