आमचं शहर, आमच बजेट

आमचं शहर, आमच बजेट

लोगो - आमचं शहर, आमचं बजेट
84562
कोल्हापूर : ‘सकाळ’च्या ‘आमचं शहर, आमचं बजेट’ उपक्रमात शहर सौंदर्यीकरणाबाबत रोटरीच्या कार्यालयात चर्चा करताना डावीकडून चंदन मिरजकर, प्रमोद पाटील, अरविंद तराळ, राजेंद्र देशिंगे, रवीकिशोर माने, अभिजित जाधव आदी.


विद्रुपीकरण रोखले, तर सौंदर्य वाढेल
मजबूत इच्छाशक्तीची गरज; ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळांची माहिती देणारे फलक लावा
कोल्हापूर, ता. २३ : ‘‘शहराला महाराणी ताराराणी व राजर्षी शाहू महाराजांचा समृद्ध वारसा आहे. तो जपण्याबरोबरच विद्रुपीकरण रोखले तरी शहराचा चेहरा सौंदर्याने झळाळून निघेल. त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची गरज नसून केवळ मजबूत इच्छाशक्तीची गरज आहे,’’ असा सूर विविध क्षेत्रांतील अभ्यासू शहरवासीयांच्या चर्चेतून निघाला.
महापालिकेच्या आगामी अंदाजपत्रकाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने घेतलेल्या ‘आमचं शहर, आमचं बजेट’ या उपक्रमांतर्गत शहर सौंदर्यीकरणाबाबतची परखड मते मांडली. तहान लागली की विहीर खणण्याची महापालिकेच्या कामकाजाची पद्धत शहरासाठी घातक असून, नियोजन हवे. तसेच एकदा प्रकल्प, उपक्रम राबवला की त्याकडे पाठ फिरवायची, तो कसा सुरू आहे, याकडे लक्ष द्यायचे नाही यातून एकेकाळी ऐतिहासिक नजाकत असलेले शहर बकाल अवस्थेकडे निघाले आहे, अशा नाराजीही या वेळी व्यक्त केली.
शहरात ऐतिहासिक, धार्मिक पर्यटनस्थळांची माहितीच पर्यटकांनाच काय, येथे राहणाऱ्या नवीन पिढीला होत नाही, असे वास्तव चर्चेत मांडण्यात आले. संबंधित ठिकाणाची माहिती देणारा फलक लावले जाणे आवश्‍यक आहेत. पर्यटकांचा गराडा असलेल्या परिसरात ऐतिहासिक शाहू खासबाग मैदान आहे, पण ते त्यांना लक्षातच येत नाही. ही अवस्था टाऊन हॉल, विविध तालमी, पुतळे, भवानी मंडप, शाहू मिल, बिंदू चौक अशा अनेक ठिकाणांची आहे. अनेक पुतळे, ठिकाणांच्या पार्श्‍वभूमीवर असलेली होर्डिंग्ज मोठा प्रश्‍न आहे. पुतळ्यांचे वा ठिकाणांची छायाचित्रे घेतली जात असताना होर्डिंग्जवरील जाहिराती कमालीच्या विरोधाभास निर्माण करणाऱ्या असतात. त्यासाठी होर्डिंग्जचा आकार वा कोणत्या जाहिराती लावल्या जाव्यात, त्याचे धोरण ठरवावे. शहरातील प्रवेशमार्ग येथील इतिहासाची ओळख करून देणारे, पर्यटकांना आकर्षित करणारे असावेत. इतिहासाला साजेसे विजेचे दिवे लावावेत. स्वच्छता कायम करण्याची आवश्‍यकता असून, मध्यवर्ती अंबाबाई मंदिर, तसेच इतर मुख्य रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत स्वच्छतेचे कर्मचारी नेमण्याचे नियोजन हवे. रोटरीसारख्या संस्थांमध्ये शहरात महिलांसाठीची अद्ययावत स्वच्छतागृहे उभी करून देण्याची तयारी आहे, पण महापालिकेने त्याच्यानंतरच्या देखभाल व स्वच्छतेबाबतचा विश्‍वास द्यायला हवा. अशा अनेक सुविधा महापालिकेला पैसा खर्च न करता निर्माण करता येऊ शकतात.
------------------
सूचना अशा
प्रवेशद्वारावर माहिती केंद्र उभे केले जावेत
महापालिकेच्या खुल्या जागा पार्किंगसाठी वापराव्यात
ॅत्या ठिकाणांशी कनेक्शन जोडणारे ॲप विकसित करावे
केएमटीने छोटी वाहने घेऊन प्रवेशद्वारातून शहरात पर्यटकांना आणावे
दोन हजार क्षमतेचे कन्व्हेक्शन सेंटर उभारण्याची गरज
जुन्या इमारतींचा विविध कारणांसाठी वापर करावा
स्वच्छतेसाठीच्या कर्मचाऱ्यांच्या कामांच्या तासांचे नियोजन करा
सोशल मीडियावर पर्यटनस्थळांची माहिती शेअर करावी
उद्याने विकसित करण्यासाठी खासगी संस्थांना द्यावीत
रस्त्यावरील झाडांना पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे
----------------
अरविंद तराळ (अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर) : महापालिकेकडून विविध सुविधांची सातत्यपूर्ण देखभाल आवश्‍यक आहे. त्याअभावी अनेक सुविधांकडे पाठ वळवली जात आहे.
राजेंद्र देशिंगे (अध्यक्ष, रोटरी समाजसेवा केंद्र ट्रस्ट) : रंकाळा तलावाजवळील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर सायन्स पार्कसारखा प्रकल्प राबवला जावा.
चंदन मिरजकर (इंटिरिअर डिझायनर) : काही सामाजिक संघटना, तज्ज्ञांनी सुचवलेल्या सौंदर्यीकरणासाठीच्या मुद्द्यांसाठी महापालिकेने स्वतःचे अधिकार वापरून अंमलबजावणी केली तर खर्च फारसा येणार नाही.
प्रमोद पाटील (अध्यक्ष, हिल रायडर्स) : प्रवेशमार्गाच्या ठिकाणी स्थानिक इतिहासातील तसेच सामाजिक सुधारणांच्या घटना पुतळ्यांच्या स्वरूपात मांडाव्यात. त्यासाठी काही ठिकाणे निश्‍चित करावीत.
अभिजित जाधव (अभियंता) : पर्यटकांच्या मनात शहराबाबतची चांगली भावना तयार करण्यासाठी स्वच्छता, तसेच फेरीवाल्यांना शिस्त लावण्याची आवश्‍यकता आहे. ती न पाळल्यास जबर दंड करावा.
रविकिशोर माने (बांधकाम व्यावसायिक) : रस्त्याकडील झाडांची छाटणी करताना वाटेल तसे तोडले जाते. त्याऐवजी आकार देत छाटणी केली तर ते सुंदरता वाढवेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com