
भुये प्राथमिक आरोग्य केंद्र
84705
...
भुये प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस
निधी न दिल्यास आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : भुये (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आली आहे. गेली दोन वर्षे या इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारतीस निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. याबाबत सातत्याने पत्रव्यवहार केला आहे, मात्र आरोग्य विभागाकडून त्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे नवीन इमारत बांधकामास निधी दिला नाही तर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा कुरणे यांनी दिला आहे.
पत्रात म्हटले आहे, भुये प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत अत्यंत जुनी आहे. त्या ठिकाणी असणारे बाथरूम, जनरल वॉर्ड, बाह्यरुग्ण विभागासह छताला गळती लागली आहे. भिंतीतून पावसाचे पाणी इमारतीत येत आहे. खिडक्या खराब झालेल्या आहेत. या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असल्याने याठिकाणी नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. याबाबत सातत्याने आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला आहे, मात्र जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव देण्यास व मंजुरीस टाळाटाळ केली जात आहे. याबाबत खासदार प्रा. संजय मंडलिक व माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या निदर्शनासही या बाबी आणल्या आहेत. जर या अर्थसंकल्पात नवीन दवाखान्यासाठी निधी दिला नाहीतर बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा कुरणे यांनी दिला आहे.
नवीन इमारतीला निधी मिळावा यासाठी पालकमंत्री, खासदार मंडलिक, जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी यांनाही निवेदन दिले असल्याचे श्रीमती कुरणे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हा नियोजनमधून निधी मिळवण्यासाठी आरोग्य विभागातील ''कनेक्शन''ची चर्चा जिल्ह्याबाहेरही होऊ लागली आहे.