
दोन सत्रातील शाळेवरुन शिक्षकांना कानपिचक्या
लोगो- जिल्हा परिषद
-
दोन सत्रांतील शाळेच्या सूचनेला विरोध
करणाऱ्या शिक्षक नेत्यांना कानपिचक्या
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : पीएचडी होऊनही तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांपेक्षा शिक्षकांचा पगार पाच ते सहा पट आहे. शिक्षक हे सरकारी नोकर असल्याने ते चोवीस तास बांधिल आहेत. त्यामुळे शाळेतील जी मुलं अभ्यासात कच्ची आहेत, त्यासाठी जादा वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळेच सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत शाळा भरवून ज्ञानदानाचे काम करावे, असे सांगत या सूचनेला विरोध करणाऱ्या शिक्षक नेत्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
दोन सत्रांत शाळा भरवून शिक्षकांवर अन्याय करू नये, अशी मागणी शिक्षक संघटनेने गुरुवारी (ता. २३) मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी पन्हाळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत आलेल्या अनुभवाचे कथनच केले. एका शाळेत दुसरीच्या मुलांना मराठी वाचता आले नाही. त्याच शाळेतील पाचवीच्या वर्गातील मुलांना दुसरीचे मराठीचे पुस्तक वाचता येत नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला या प्रकाराची लाज वाटली. तुम्हाला शिकवता येत नाही, याची लाज वाटत नाही का, असा प्रश्न करत शिष्टमंडळाला चांगलेच धारेवर धरले.
सर्व शासकीय नोकर हे २४ तास बांधील आहेत. सीईओ आणि शिक्षकांनाही तोच नियम आहे. त्यामुळे जादा तास घेणार नाही, दोन सत्रांऐवजी एकाच सत्रात शाळा भरवावी, अशा मागण्या मान्य होणार नाहीत. जे विद्यार्थी कच्चे आहेत, त्यांच्यासाठी जादा तास घ्यावेच लागतील, असा सज्जड दमही चव्हाण यांनी दिला. किती शिक्षक मुख्यालयी राहतात, घरभाडे भत्ता किती घेतात, याची सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे या विषयावर अधिक चर्चेची गरज नसल्याचे सांगत त्यांनी चांगलेच फटकारले.