
हिपॅटाईटस बी
लोगो- सीपीआर
‘हिपॅटायटिस’ नियंत्रणासाठी हवा स्वतंत्र कक्ष
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटिस नियंत्रण कार्यक्रम राज्यभर राबवला जातो. त्यानुसार अतिगंभीर रुग्णांवरील उपचारासाठी राज्यात चार केंद्रे वाढवली आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात मॉडेल ट्रिटमेंट सेंटर उभारली आहेत. येथे हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’च्या रुग्णांचे निदान व उपचार सेवा या सुरू आहेत. सीपीआरमध्ये मेडिसीन विभागातून ही सेवा दिली जाते; मात्र माहितीअभावी येथे मोजक्याच रुग्णांना याचा लाभ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘सीपीआर’मध्ये हा स्वतंत्र विभागच सुरू होणे गरजेचे आहे.
हा कावीळसदृश गंभीर आजार आहे. रुग्णांची प्रकृती खालावणे, मनोबल खचणे, पचनक्रिया बिघडणे, भूक मंदावणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक क्षमता कमी होणे आदी लक्षणे हिपॅटायटिस बी किंवा सी तसेच गंभीर रुग्णांमध्ये दिसतात. अशा रुग्णांची वेळीच तपासणी करून उपचार केले जातात. हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’ची तपासणी करणे, गंभीर रुग्णांना लसीकरण करणे, ‘सी’च्या रुग्णांना औषधोपचार देणे असे कार्य या केंद्रातून होत आहे. अतिगंभीर रुग्णावर सायन व केईएम (मुंबई), बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे, रत्नागिरी, नागपूरसह अन्य तीन जिल्ह्यांतील शासकीय रुग्णालयात उपचार होत आहेत.
सर्व गरोदर मातांची हिपॅटायटिस बी तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ‘सीपीआर’मध्ये तपासणी झालेल्यास गरोदर मातांना गरजेनुसार या सेंटरमध्ये उपचार मिळतात; मात्र अनेक माता खासगी रुग्णालयात जातात तेव्हा त्यांची हिपॅटायटिसची तपासणी काही ठिकाणी होते. काही ठिकाणी जुन्याच तपासणीचा आधार घेऊन प्रसूतीही होते. त्यातही कोणी महिला हिपॅटायटिस पॉझिटव्ह असेल तर सीपीआरकडे पाठवले जाते. त्यांना ‘सीपीआर’मध्ये कक्ष नेमका कोठे आहे, तेथे कोणाला भेटावे येथपासून ते उपचार होतील की नाही, याबाबतच्या शंका असतात. त्यामुळे खासगी रुग्णालयात त्या जात आहेत. विशेषतः सीमाभागातून येणाऱ्या महिलांचा हा अनुभव आहे. अल्पशिक्षित किंवा निराधार व्यक्तींची तपासणी होतेच असे नाही.
‘सीपीआर’मध्ये याबाबतचा माहिती फलक सहज दिसत नाही. हा कक्ष स्वतंत्र असणे अपेक्षित आहे.
यासाठी तपासणी महत्त्वाची
यात ‘बी’ पॉझिटिव्ह येणाऱ्या मातांचे बाळ जन्माला येताच त्याला ही हिपॅटायटिस ‘बी’ प्रतिबंधक लस दिली जाणे आवश्यक आहे. जेणेकरून मातेकडून बाळाला त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी सुविधा केली आहे. नवजात शिशू हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’च्या बाधित असलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील एका व्यक्तीची काळजी वाहक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याला प्रती महिना ८ हजार रुपयांचे मानधनही देण्यात येत आहे.
या रुग्णांची होणार ‘बी’ व ‘सी’ची तपासणी
-एआरटी उपचारावरील रुग्ण
-डायलेसीस उपचारातील रुग्ण थॅलेसिमीयाचे रुग्ण
-हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’चे पॉझिटिव्ह रक्तदाते
-शस्त्रक्रिया करण्यात येणारे रुग्ण
कोट
सीपीआरमध्ये हिपॅटायटिसचे निदान व उपचार सेवा सुरू आहे. मेडिसीन विभागामार्फत ही सेवा मिळते. गंभीर रुग्णांच्या डायलेसीसचीही सुविधा सुरू झाली आहे.
-डॉ. गिरीश कांबळे, सीपीआर.