
केएमटी विषय
85113
अतिरिक्त आयुक्तांच्या
दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या
---
‘केएमटी’चे तोट्यातील मार्ग बंदबाबत प्रशासकांबरोबर होणार बैठक
कोल्हापूर, ता. २४ ः पाठपुरावा करूनही ‘केएमटी’च्या तोट्यातील मार्ग बंद करण्याबाबत प्रशासन चालढकल करीत आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी बैठकीच्या इतिवृत्ताची मागणी करीत आज अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दोन तास ठिय्या मारला. यावरून अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व ॲड. बाबा इंदुलकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. दोन तास अधिकारी खुर्चीवर व कार्यकर्ते जमिनीवर बसूनच बैठक झाली. शेवटी तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी दहा दिवसांत प्रशासकांबरोबर बैठक घेण्याचे ठरले.
कॉमनमॅन संघटना, प्रजासत्ताक सामाजिक संघटना, जिजाऊ ब्रिगेड, ‘आप’चे पदाधिकारी सहभागी झाले. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी उपस्थित होत्या. ॲड. इंदुलकर यांनी केएमटी तोट्यात असताना कणेरी मठावर १० बस दिल्या, त्यासाठी पैसे घेतले का? त्यासाठी कोणाचे आदेश होते, उधारीवर बस देणे परवडणारे आहे का? शक्य असेल तर शहरातील इतर कार्यक्रमांसाठीही उधारीवर बस देण्याचे धोरण आखावे, असे सांगत जाब विचारला. त्याबाबत प्रशासनाकडून ठोस उत्तर दिले नसल्याने तसेच तोट्यातील मार्गाबाबत निर्णय घेतलेला नाही. काही काम करीत नाहीत, असा टोला इंदुलकर यांनी लगावल्यावर अतिरिक्त आयुक्त देसाई संतापले. त्यातून दोघांमध्ये खडाजंगी झाली. आताच्या बैठकीचे इतिवृत्त लिहिले जावे, ही मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून महिलांसह साऱ्या जणांनी ठिय्या मारला.
ॲड. इंदुलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाची चालढकल उघड केली. मार्ग बंदबाबत निर्णय घेतलेला नाही. कोणाच्या सांगण्यावरून वा दबावामुळे प्रशासन निर्णय घेत नाही, असे दिसते. १८ पैकी १४ मार्गांवर तोटा दिसल्याने शहर हद्दीतच बस चालवा. उत्पन्न देतात तेच मार्ग चालवा. महापालिकेकडून ‘केएमटी’ला पैसे देऊ नका. शासनाकडून अनुदान मागा. तोट्याची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करा. चालक-वाहकांअभावी बस बंद असून, पार्किंगच्या ठिकाणी अशा कर्मचाऱ्यांना उभे केले जाते. ही ड्यूटी देण्यासाठी व मिळविण्यासाठी काही यंत्रणा कार्यरत आहे, असे सांगितले. अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक गवळी यांनी कणेरी मठासाठी बस देण्याबाबतचे पत्र महापालिकेने दिले आहे. बसची संख्या वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, बंद असलेल्या सात बस मार्गावर आणल्या आहेत. आणखी नऊ बस आणण्याचा प्रयत्न आहे. तोट्यातील मार्गाबाबतचा प्रस्ताव दिला आहे, असे सांगितले. सुनीता पाटील, सुधा सरनाईक, लता जगताप, सुवर्णा मिठारी, पूजा पाटील, रजनी कदम, मयूरी सुतार, अश्विनी सुतार, अभिजित कांबळे, उत्तम पाटील उपस्थित होते.