
महावीर
85138
कोल्हापूर ः श्री आचार्यरत्न देशभूषण मुनिराज स्मृती व्याख्यानमालेच्या बोलताना प्रा. डॉ. वेणीमाधवशास्त्री जोशी. शेजारी ॲड. के. ए. कापसे व अन्य.
संस्कृत व प्राकृत भाषा एकाच
नाण्याच्या दोन बाजूः डॉ. जोशी
कोल्हापूर, ता. २४ ः संस्कृत व प्राकृत भाषा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजातील सुशिक्षित व सामान्य लोकांची साहित्यिक भूक भागवण्याचे काम या दोन भाषांनी केले आहे. महाराष्ट्री प्राकृतमधील साहित्यात जीवनातील सौंदर्य आणि सार आहे, असे प्रा. डॉ. वेणीमाधवशास्त्री जोशी यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठ आणि महावीर महाविद्यालय आयोजित आचार्यरत्न श्री. देशभूषण मुनिराज स्मृती व्याख्यानमालेमध्ये बारावे पुष्प गुंफताना ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष ॲड. के. ए. कापसे, प्रा. डॉ. जयकुमार उपाध्ये, मोहन गरगटे, गुणवंत रोटे, ॲड. पी. आर. पाटील, डॉ. सुषमा रोटे आदी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. उपाध्ये म्हणाले, ‘गाथा सप्तशतीपासून प्राकृत सटककाव्य आणि मराठी लोककला असा एक स्वतंत्र अभ्यास होणे गरजेचे आहे. सामान्य जनजीवनाचे अनेक आयाम सटृक आणि प्राकृत भाषेमध्ये दिसतात.’ अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. रोटे म्हणाल्या, ‘भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांनी प्राकृत भाषांना उपदेशाची भाषा बनवली. प्राकृत भाषांच्या विकासामध्ये कुंद कुंदा आचार्य ते आचार्य विद्यानंद आशा परंपरेच्या अभ्यास झाला पहिजे.’ प्राचार्य डॉ. किरण चौगुले, आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य प्रतीक पाटील, भगवान महावीर अध्यासनाचे डॉ. विजय काकडे, पासगोंडा पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे याने केले. परिचय डॉ. प्रकाश कांबळे यांनी करून दिला. भटारक लक्ष्मीसेन महाराज यांच्या आशीर्वाचनाचे वाचन डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा पाटील, प्रा. संध्या जाधव यांनी केले.