
ए.एस.ट्रेडर्स -सरकारी वकील युक्तीवाद
ए. एस. ट्रेडर्सचा इतर कंपन्यांशी संबंध
---
सरकारी वकिलांकडून खाते उतारा सादर
कोल्हापूर, ता. २७ ः ए. एस. ट्रेडर्सचा इतर कंपन्यांशी संबंध असल्याचा खाते उतारा आज सरकारी वकील अल्ताफ पिरजादे यांनी न्यायालयात सादर केला. त्यामुळे ए. एस. ट्रेडर्सचे लोहितसिंह सुभेदार यांच्यासह इतरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी ॲड. पिरजादे यांनी केली. यावर पुढील तारीख ४ मार्च असून, त्या दिवशी अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे ॲड. पिरजादे यांनी सांगितले. जिल्हा न्यायाधीश (वर्ग ४) एस. पी. गोंधळेकर यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे.
ए. एस. ट्रेडर्सच्या अन्य सहा कंपन्यांकडून ए. एस. ट्रेडर्सला पैसे दिल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. यात संबंधित कंपन्यांनी काही पैसे दिल्याच्या नोंदी असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणले. ‘एमपीआयडी’ कायद्यानुसार पैसे वसूल करण्याची आणि गुंतवणूकदारांना देण्याची तरतूद आहे. त्यामुळे संबंधित संशयित आरोपींची मालमत्ता कोठे आहे, त्यांनी कोठे गुंतवणूक केली आहे यासह अन्य तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी केल्याची माहिती ॲड. पिरजादे यांनी दिली. तसेच, एका संशयित आरोपीला अटक झाली. त्यामुळे त्याचा अर्ज या सुनावणीतून मागे घेण्यात आला आहे.