महावितरण आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण आंदोलन
महावितरण आंदोलन

महावितरण आंदोलन

sakal_logo
By

प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात एल्गार
.....
इरिगेशन फेडरेशनकडून दरवाढीच्या प्रस्तावाची होळी
कोल्हापूर, ता. २८ ः सहकारी पाणीपुरवठा संस्था व वैयक्तिक शेतीपंपधारकांना वीज दरवाढ करू नये, शेतीपंपांना वीज मीटर बसवून बिलांची आकारणी करावी यासह विविध मागण्या महाराष्‍ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने आज निवेदनाद्वारे केल्या. या वेळी ‘महावितरण’ने वीज नियामक आयोगाला दिलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची होळी करीत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
येथील ताराबाई पार्कातील ‘महावितरण’च्या मुख्य कार्यालयासमोर प्रस्ताव होळी आंदोलन झाले. फेडरेशनचे निमंत्रक विक्रांत पाटील- किणीकर म्हणाले, की पाणीपुरवठा संस्था, शेतकऱ्यांनी संभाव्य वीज दरवाढीला विरोध केला नाही, तर वीज दरवाढ मान्य असल्याचा अर्थ निघू शकेल. त्या आधारे वीज दरवाढ आयोगाने मान्य केल्यास भविष्यात पाणीपुरवठा संस्थांच्या वीजबिलांत दुप्पट-तिप्पट वाढ होऊ शकते. त्यामुळे पाणीपट्टीही तेवढ्याच पटीत वाढवावी लागेल. असे झाले तरी पाणीपुरवठा संस्था चालविणे मुश्कील होणार आहे. पाणीपुरवठा संस्थांची सवलतीची मुदत येत्या मार्चला संपणार आहे. सध्या मोठ्या संस्था एक रुपया १६ पैसे युनिटप्रमाणे बिल भरतात. त्यात वाढ होऊन चार रुपये २५ पैसे युनिटचा दर होऊ शकतो. त्यामुळे एक लाख ते दीड लाख बिल येत होते, ते चार लाखांवर बिल येऊ शकेल; तर लहान संस्थांच्या एक रुपये प्रतियुनिटऐवजी एक रुपया ९१ पैसे युनिटचा दर होईल. त्यामुळे एकूण बिलाला दुप्पट ते चौप्पट रक्कम मोजावी लागेल. त्यामुळे पाण्याचे दरही वाढवावे लागतील, असा धोका आहे.
माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, की शेतकऱ्यांचे शेतातील काबडकष्ट‍ तेच आहेच. त्याला महागाईचा फटका बसतो. ज्या विजेवर शेती व्यवसाय अवलंबून आहे, त्याच विजेचा शेतकऱ्यांना मोठा खर्च आहे. शेतकऱ्यांना ३० पैसे युनिटप्रमाणे दर आकारावा, यासाठी डॉ. एन. डी. पाटील, अशोक पाटील-किणीकर व बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी आंदोलने केली. त्यामुळे वीजबिलांत सवलत मिळू लागली. मात्र, अलीकडच्या काळात ‘महावितरण’चे वीज खांब, वीज तारा, उपकेंद्रे तीच आहेत. तरीही वीजबिलांची सतत दरवाढ झाली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी संघटितपणे संभाव्य वीज दरवाढीला विरोध करणे आवश्यक आहे.
या वेळी फेडरेशनचे चंद्रकांत पाटील, व्यंक्काप्पा भोसले, मारुती पाटील, आर. के. पाटील, भारत पाटील आदी उपस्थित होते.
....

इरिगेशन फेडरेशनच्या मागण्या ः
शेतीपंपांना १२ तास अखंड पुरवठा द्यावा
महावितरण कंपनीने कमी दरातील वीज खरेदी करावी
राज्यातील वीजपंपांना मीटर बसवून त्यानुसार वीजबिल आकारावे
पाणीपुरवठा संस्थांचे रीडिंग वेळेत व अचूक घ्यावे
हॉर्सपॉवरनुसार वीजबिलांची आकारणी करू नये
वीजचोरी व गळतीला आळा घालावा