
जिल्हाधिकारी थिरकले
85947
जिल्हाधिकाऱ्यांनी धरला ठेका
महसूल क्रीडा स्पर्धेचे निमित्त ः अन्य अधिकाऱ्यांनीही धरला ताल
कोल्हापूर, ता. २८ ः पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभात जिल्हाधिकारी राहूल रेखावार ‘झिंगाट’ गाण्यावर ठेका धरला.
पोलिस कवायत मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात करवीरसह अन्य प्रांताधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनीही या गाण्यावर ताल धरून धमाल उडवून दिली.
पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद यावर्षी कोल्हापुरला होते. २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पोलिस कवायत मैदानासह कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोशिएशन, महापालिकेच्या सासने मैदान व महसूल कल्याण निधीच्या सभागृहात झाल्या. या स्पर्धेत कोल्हापूरने विजेतेपद मिळवले. या विजयाचा जल्लोष स्पर्धेतील खेळाडुंसह अधिकारी, कर्मचारी यांनी केला.
सांस्कृतिक कार्यक्रमाने या स्पर्धेची सांगता झाली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर सर्वसाधारण विजेतेपदासह अन्य सांघिक स्पर्धेतील निकाल घोषित करण्यात आले. या निकालात कोल्हापूर सर्वसाधारण विजेते ठरल्यानंतर कर्मचाऱ्यांनी ‘झिंगाट’ चित्रपटातील ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्यावर एकच ताल धरला. यावेळी कोल्हापुरी फेटा बांधलेल्या जिल्हाधिकारी रेखावार यांनाही कर्मचाऱ्यांनी नाचण्याची विनंती करताच त्यांनी ठेका धरला. त्यांच्यासह अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, इचलकरंजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पन्हाळा प्रांताधिकारी माळी, गडहिंग्लज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे आदी त्यात सहभागी झाले.