संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

85937
‘फिनिक्स'' एकांकिकेचे सादरीकरण
कोल्हापूर ः येथील जाणीव चॅरिटेबल फाऊंडेशन संचलित आनंदयात्री या उपक्रमाअंतर्गत प्रा. दिलीप परदेशी यांनी लिहिलेल्या ‘फिनिक्स'' या एकांकिकेचे सादरीकरण झाले. माणसाच्या मनातील भूतदया, वात्सल्य आणि प्रेम या मूलभूत प्रेरणांचे दर्शन घडवणारी ही एकांकिका होती. ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी यांचे दिग्दर्शन तर अक्षय सुतार, अजिंक्य यादव आणि पारस सोळंकी यांच्या भूमिका होत्या. ओंकार पाटील याने संगीत आणि ओंकार मासरणकर याने रंगमंच व्यवस्थापन पाहिले. डॉ मीना पोतदार- ताशिलदार आणि समीर पंडितराव यांनी ''रिल्केची पत्रे'' हे अभिवाचन केले. योगिता भागवत- जाधव यांनी अनुवादित केलेल्या कविता या अभिवाचनात सादर झाल्या.‘जाणीव''तर्फे रविदर्शन कुलकर्णी यांनी आनंदयात्री उपक्रमात इतर संघांनाही सादरीकरणासाठी आवाहन केले. श्रीजीवन तोंदले यांनी सूत्रसंचालन केले.
............
86020
राष्ट्रीय स्पर्धेत कलापूरच्या चित्रकारांचे यश
कोल्हापूर ः प्रफुल्ला डहाणूकर फाउंडेशनने ‘कलानंद’ उपक्रमात घेतलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या कलाकारांनी यश मिळवले. ‘इन्पायरिंग इंडीया’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा झाली. देशभरातील हजारो कलाकारांनी यामध्ये सहभाग नोंदवला. या स्पर्धेत विजय उपाध्ये यांच्या कलाकृतीस मेरीट ग्रॅण्ट अ‍ॅवॉर्ड जाहीर झाले, तर विजय टिपुगडे, जावेद मुल्ला, हर्षवर्धन बेडेकर या कलाकारांच्या कलाकृतींना प्रशस्तीपत्र मिळाले आहे. या कलाकृतींचे प्रदर्शन १ एप्रिलपासून कालाघोडा येथील कार्ल खंडालवाला कलादालनामध्ये होणार आहे.
............
86019
डॉ. पी. जी. कुलकर्णी यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर ः येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. पी. जी. कुलकर्णी लिखित ‘माझ्या अनुभवाची शस्त्रक्रिया‘ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांच्या हस्ते झाले. लिहिण्याची ऊर्मी अतीतीव्र असते. ती थोपवता येत नाही. डॉ. कुलकर्णी यांच्याकडे ही उर्मी असल्यानेच त्यांच्याकडून सातत्याने लेखन होत असल्याचे डॉ. गवस म्हणाले. मंजुश्री गोखले, वैशाली नायकवडे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.
..............
रोटरॅक्ट क्लबतर्फे राजभाषा दिन
कोल्हापूरः मराठी टिकवायची असेल, तिचे संवर्धन करायचे असेल, तर नित्याच्या व्यवहारात अधिकाधिक मराठी शब्दांचा उपयोग केला पाहिजे. आंग्ल आणि परभाषेतील शब्दांना चांगले आणि सोपे मराठी शब्द उपलब्ध होऊ शकतात. माय मराठी मरत असताना परकीचे पाय चेपू नका, असे मत ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी व्यक्त केले. रोटरॅक्ट क्लबच्या वतीने आयोजित कवि संमेलनात ते बोलत होते. यावेळी सुजाता पेंडसे, अपर्णा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. रोटरॅक्ट क्लब, कोल्हापूरचे अध्यक्ष अथर्व ढणाल यांनी स्वागत केले. विश्वराज जोशी, डॉ. विनोद कांबळे, गौरी भोगले, युवराज राजिगरे, ज्योत्स्ना डासाळकर, शब्बीर काझी, शीतल शेटे, प्रताप पाटील, अरुण सुणगार, डॉ. प्रिया दंडगे आदींनी कविता सादर केल्या. प्रकल्प प्रमुख गायत्री आणेकर यांनी आभार मानले.
..............
86018
गंधार बुगलेचे यश
कोल्हापूर ः पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने झालेल्या पोदार इन्स्पायरिंग एक्सलन्स ओलिंपियाड परीक्षेमध्ये श्री समर्थ बालमंदिर शाळेचा विद्यार्थी गंधार रणजीत बुगले याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याला मुख्याध्यापिका प्राजक्ता जोशी, प्रियांका देसाई, विद्या नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.