पाणी गळती

पाणी गळती

गळतीने पाणीपुरवठा विभाग बेजार
उन्हाळ्यातील त्रासाने नागरिक हैराण; शोधासाठी यंत्रणा आवश्‍यक

कोल्हापूर, ता. १ ः अनेक जुन्या पाईपलाईनवरील गळतीतून पाणी वाया जात आहेच. शिवाय आता त्यात गॅस पाईपलाईनच्या खोदाईने कनेक्शन तोडल्याने भर पडत आहे. पाणी उपसा व्यवस्थित सुरू आहे, दररोज पुरवठाही आहे, तरीही कमी दाबाने पाणीपुरवठ्याचा त्रास भेडसावत आहे. अनेक ठिकाणी गटारातून वाहून जाणारे, रस्त्यावर येणारे पाणी दिसत असूनही त्याच्या गळतीचे ठिकाण समजत नसल्याने पाणीपुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना नागरिक पाणीपुरवठ्याच्या या त्रासाने बेजार होऊ लागले आहेत.
शहरातील जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम अमृत योजनेतून केले आहे. अनेक ठिकाणी पाईप बदललेल्या नाहीत. जिथे बदलल्या आहेत, तिथे जुनी पाणी कनेक्शन जोडून घेतली आहेत. पीव्हीसी प्रकाराच्या पाईप तसेच कनेक्शन जोडण्याचे साहित्य आहे. जिथे खोदाई केली, तेथील पॅचवर्क करण्यात येत आहे. त्यासाठी मोठी खडी टाकून रोलरने दाबून पॅचवर्क केले जात आहे. त्यातून अनेक ठिकाणी कनेक्शन तुटली तरी त्यावर डांबरीकरण केले जात असल्याने तिथून पाणी बाहेर येत नसल्याचा पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना अनुभव येत आहे. दुसरीकडून पाणी बाहेर येते व त्यासाठी ठिकठिकाणी खड्डे मारण्याशिवाय पर्याय नाही. त्यातूनही गळती सापडत नसल्याची स्थिती आहे. पाण्याच्या खजिन्यापासून मिरजकर तिकटीपर्यंत प्रचंड जुनी पाईप आहे. ती अजून सुरू असल्याचे भागातील नागरिक सांगतात. ज्यावेळी रात्री त्या पाईपमधून पाणी सोडले जाते, त्यावेळी शेजारील गटारातून तसेच ड्रेनेज लाईनमधून पाण्याचा प्रवाह वाढतो, असे स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे; पण हा मुख्य रस्ता असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. अशा प्रकारच्या गळती ठिकठिकाणी आहेत.
त्यात आता गॅस पाईपलाईनसाठीच्या खोदाईने भर पडली आहे. खोदाई करताना अनेक कनेक्शन तोडली जात आहेत. ती दुरुस्त करून दिली जात आहेत, पण लोखंडाची दुरुस्ती पीव्हीसी साहित्याने केली जात आहे. ज्यावेळी ही पाईप बुजवून त्यावर पॅचवर्क केले जाते, त्यावेळी तो जोड निसटत असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसून येत आहे. सध्या दाट वस्तीत पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. त्यात अनेक कनेक्शनना फटका बसत आहे. गळतीचे पाणी दुसरीकडून बाहेर येत असून, गळती शोधता येत नसल्याची स्थिती आहे. या प्रकारांनी अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातून गळतीचे प्रमाण वाढले असण्याची शक्यता आहे. विभागाचे अधिकारीही पाहणी करून जातात; पण त्यांनाही समजत नाही.

चौकट
गळतीचे प्रमाण समजण्याची गरज
यापूर्वी महापालिकेने केलेल्या वॉटर ऑडिटमध्ये ३०.२१ टक्के पाण्याचेच बिलिंग होत असून, ६९.७९ टक्के पाण्याचे बिलिंगच होत नसल्याचे दिसले होते. बिलिंग होत नसलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी वाहून नेताना २५.७७ टक्के, तर वितरणात ३०.४२ टक्के गळतीचे प्रमाण होते. या दोन कारणांतूनच ५५ टक्क्यांवर पाणी गळती दाखवली होती. मध्यंतरी केलेल्या गळती दुरुस्तीनंतर त्याचे प्रमाण किती कमी झाले हे समजलेले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com