रस्त्याकडेच्या पिकांचा कोंडतोय श्वास! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याकडेच्या पिकांचा कोंडतोय श्वास!
रस्त्याकडेच्या पिकांचा कोंडतोय श्वास!

रस्त्याकडेच्या पिकांचा कोंडतोय श्वास!

sakal_logo
By

gad२८.jpg
86417
अत्याळ : संकेश्वर-बांदा महामार्गाच्या कामामुळे रस्त्याकडेला असणाऱ्या शेतातील पिकांच्या पानावर साचलेली धूळ.
--------------------------
रस्त्याकडेच्या पिकांचा कोंडतोय श्वास!
पानांवर साचला धुळीचा थर : वाढीवर परिणाम, उत्पादनात येणार घट
अवधूत पाटील : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : संकेश्वर-बांदा महामार्गाचे काम सुरु आहे. या कामामुळे उठणाऱ्या धुळीने वाहनधारकांचा जीव मेटाकुटीला आणला आहेच. पण, पिकांचाही श्वास कोंडत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला १०० ते १५० मीटरवरील पिकांच्या पानांवर धुळीचा थर साचला आहे. परिणामी, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंदावली असून पिकांच्या वाढीवर परिणाम होणार आहे. यातून उत्पादनात सुमारे १०-१५ टक्के घट येण्याची शक्यता आहे.
संकेश्वर-बांदा हा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. त्याच्या दुपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या बाजूपट्टीच्या मजबुतीकरणासाठी मुरमाचा भराव टाकला आहे. हा महामार्ग सिमेंटचा होणार असल्याने काही ठिकाणी मुख्य डांबरी रस्ताही उकरण्यात आला आहे. यामुळे संकेश्वर-आजरा दरम्यान धुळीचे साम्राज पसरले आहे. दुचाकी-चारचाकी वाहन गेले की धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.
रस्त्यावरुन उठलेली धूळ वाऱ्यामुळे सर्वत्र पसरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रामुख्याने ऊस, ज्वारी, मक्का आदी पिके आहेत. या पिकांच्या पानावर धुळीचे थर साचलेले आहेत. पानावर साचलेल्या धुळीमुळे छिद्रे बंद होऊन त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावण्यावर झाला आहे. सहाजिकच पिकांच्या वाढीवर याचा परिणाम होणार आहे. त्यातून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. किमान १० ते १५ टक्केपर्यंत ही घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
---------------
अप्रत्यक्ष नुकसानीचे काय...
संकेश्वर-बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी लढा सुरु केला आहे. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत नाही. तर दुसरीकडे रस्त्याच्या कामामुळे दोन्ही बाजूच्या पिकांचे अप्रत्यक्षरित्या नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------------
लांबी कमी असणाऱ्या पानांच्या खालील बाजूस छिद्रे असतात. तर अधिक लांबीच्या पानांना दोन्ही बाजूला छिद्रे असतात. ज्याव्दारे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडत असते. ऊस, ज्वारी, मक्का ही लांब पाने असणारी पिके आहेत. त्यांच्या पानावर साचलेल्या धुळीचा परिणाम प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेवर होऊ शकतो.
- डॉ. श्रीकांत पाटील, वनस्पतीशास्त्र विभाग
डॉ. घाळी महाविद्यालय, गडहिंग्लज

""रस्त्याकडेला असणाऱ्या शेतात ऊस, ज्वारी आणि मक्क्याचे पीक आहे. रस्त्याच्या कामामुळे उडालेली धूळ या पिकांवर पसरलेली आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. जनावरांसाठी मक्का घातला होता. पण, पानावरील धुळीमुळे जनावरे मक्का खात नसल्याने अडचण झाली आहे.''''
- दिगंबर सुतार (शेतकरी)
कौलगे, ता. गडहिंग्लज