तम्मे गुजराती भाषा आवडे छे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तम्मे गुजराती भाषा आवडे छे?
तम्मे गुजराती भाषा आवडे छे?

तम्मे गुजराती भाषा आवडे छे?

sakal_logo
By

लोगो - परभाषेतून शिक्षण भाग : ३

तम्मे गुजराती भाषा आवडे छे?
समाजातील एकमेकांना प्रश्‍न; भाषेशी असणारा संपर्क झाला कमी
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : तुम्हाला गुजराती भाषा येते का? (तम्मे गुजराती भाषा आवडे छे?) असा प्रश्‍न आता गुजराती कुटुंबातील लोकच एकमेकांना विचारत आहेत. कारण बहुतांशी गुजराती कुटुंबातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली. त्यामुळे त्यांचा गुजराती भाषेशी असणारा संपर्क कमी झाला. एकेकाळी गुजराती हायस्कूलमध्ये या समाजातील विद्यार्थी शिकायचे; पण आता ही शाळा बंद झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी करवीर संस्थानातील व्यापार वाढावा. इथल्या उत्पादनांची अन्य बाजारपेठेत विक्री व्हावी या उद्देशाने गुजरातमधून व्यापाऱ्यांना कोल्हापुरात आणले. शाहूपुरीत त्यांना जागा दिल्या. मग इथे विविध प्रकारचा व्यापार सुरू झाला. विशेषतः कोल्हापुरी गुळाची विक्री इथून गुजरातमध्ये व्हायची. गुजरातमधून आलेले हे परिवार येथेच स्थायिक झाले. सुमारे ८० वर्षांपूर्वी गुजराती लोकांनी एकत्र येऊन गुजराती मित्र मंडळाची स्थापना केली. या मंडळाने एक गुजराती शाळा सुरू केली. यासाठी हरिराम करसनदास सोमैय्या यांनी जागा उपलब्ध करून दिली. मग शाहूपुरीमध्ये गुजराती भाषेतून शिक्षण देणारी शाळा सुरू झाली. सुरुवातीला प्राथमिक आणि नंतर माध्यमिक शाळा सुरू झाली. दहा-बारा वर्षांपूर्वीपर्यंत ही शाळा सुरू होती. एकेकाळी या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिकत होते. शाळेमध्ये सर्व अभ्यासक्रम गुजराती भाषेत शिकवला जायचा. त्यामुळे मुलांना विषयाचे आकलन चांगले होत होते. गुजराती शाळेतून शिकलेले विद्यार्थी इंजिनिअर, डॉक्टर तर झालेच; पण काहींनी आय.आय.टी.मधूनदेखील शिक्षण घेतले आहे. आज ही सारी मंडळी विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करत आहेत. या शाळेत सुमारे दोन हजार पुस्तकांचे ग्रंथालय होते. बहुतांशी पुस्तके ही गुजराती भाषेतील होती. शाळेत गुजराती सण, उत्सव उत्साहात साजरे केले जायचे. कोल्हापूरसारख्या परक्या मुलखातही या शाळेने गुजराती भाषा आणि संस्कृती जपली होती. काळाच्या ओघात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या. पालकांनी मुलांना या शाळेत पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुजराती हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला. आता ही शाळा बंद झाली. येथे एक इंग्रजी शाळा सुरू आहे.
गुजराती हायस्कूल बंद झाल्याने आता गुजराती भाषा शिकण्याची अडचण निर्माण झाली आहे. ज्यांच्या घरी गुजराती बोलतात अशांनाच ही भाषा येते. त्यामुळे गुजराती असून गुजराती भाषा येते का? असा प्रश्न पडण्याची वेळ आली आहे.
--------------
कोट
गुजराती हायस्कूलने आमच्या समाजाच्या पिढ्या घडवल्या. मातृभाषेत शिकून आमची मुले उच्चशिक्षित झालीत; पण सध्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याने ही शाळा बंद करावी लागली. मात्र, या शाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी आपल्याला शहरात आणि बाहेरही भेटतील.
- महेंद्र दलाल, सचिव, गुजराती मित्र मंडळ
----------------------------------------
बागवानी नाही दख्खनी...
उर्दू शाळांबाबतच्या बातमीमध्ये स्थानिक मुस्लिम बागवानी भाषा बोलतात असा उल्लेख आहे. या भाषेला बागवानी नव्हे, तर दख्खनी असे संबोधले जाते.