सिलिंडर दराचा भडका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडर दराचा भडका
सिलिंडर दराचा भडका

सिलिंडर दराचा भडका

sakal_logo
By

घरगुती सिलिंडरची ‘सबसिडी’ पुन्हा सुरू करा
गृहिणींतून मागणी; हॉटेल व्यवसायिकांतही नाराजीचा सूर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : साधारण दहा वर्षांपूर्वी घरगुती गॅस सिलिंडरच्या एकूण किमतीवर अनुदान दिले जात होते. तरीही त्याची किंमत पाचशे रुपयांच्या आत होती. आता महागाई वाढली. एका १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी तब्बल एक हजार १०६ रुपये मोजावे लागत आहेत. यामध्ये एकही रुपयांचे अनुदान नाही. सर्वसामान्यांना याची झळ बसत आहे. त्यामुळे गॅस सिलिंडरचे अनुदान पुन्हा सुरू करा, अशी मागणी गृहिणींतून जोर धरत आहे.
दरम्यान, १९ किलोच्या कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ३५१ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे महागाईच्या भडक्यात आणखी दरवाढीचे तेल ओतले गेले आहे. हॉटेलातील पदार्थ आता आणखी महाग होणार आहेत. त्याचीही झळ चहाच्या गाड्यावरील पदार्थांपासून ते उंची हॉटेलातील पदार्थांपर्यंत बसणार आहे.
--------------------
चौकट
खवय्यांच्या खिशाला झळ
कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे चहापासून कांदापोहे, कांदाभजी, वडापावपासून ते हॉटेलातील पदार्थांचेही दर भडकण्याची शक्यता आहे. एकदा दर वाढले तर ते पुन्हा कमी केले जात नाहीत. पुन्हा सिलिंडरचे दर कमी झाले तरीही एकदा केलेली दरवाढ व्यावयासिक पुन्हा कमी करीत नाही. त्याचाही फटका खवय्यांच्या शिखाला बसणार आहे.
----------------------
घरगुती गॅस सिलिंडर दर
मे, जून आणि जुलै - १००६ रुपये
सात जुलै ते २८ फेब्रुवारी -१०५६ रुपये
एक मार्च - ११०६ रुपये.
तब्बल पन्नास रुपयांची वाढ
-----------------------
कमर्शिअल गॅस सिलिंडर दर
ऑगस्‍ट - १९५७ रुपये ५० पैसे
सप्टेंबर - १८६५ रुपये ०० पैसे
ऑक्टोबर - १८३४ रुपये ५० पैसे
नोव्हेंबर आणि डिसेंबर - १७१९ रुपये ०० पैसे
जानेवारी - १७४४ रुपये ५० पैसे
फेब्रुवारी - १७४४ रुपये ०० पैसे
मार्च - २०९५ रुपये ०० पैसे
(गतवर्षी मार्च मध्ये १९८६ रुपये दर होता.)
------------------
कोट
घरगुती गॅस सिलिंडरही गरीब, सर्वसामान्य, श्रीमंतांच्या घरी सुद्धा गरजेचाच आहे. त्यामुळे त्याचे दर वाढविल्यामुळे सर्वसामान्य आणि गरीबांना पर्यायी बचत करावी लागते. यापूर्वी सिलिंडरवर ‘सबसिडी’ दिली जात होती. अलीकडे तीही बंद केली आहे. आता ती ‘सबसिडी’ पुन्हा सुरू करायला पाहिजे.
- अक्षता खटावकर, गिरणी व्यावसायिक, सुभाषनगर
-----------------------
काँग्रेसच्या सरकारमध्ये गॅस सिलिंडरला अनुदान दिले जात होते. दर कमी असतानाही हे अनुदान सुरू होते. मात्र अलीकडे सिलिंडरचे दर हजाराहून अधिक झाले तरीही अनुदान दिले जात नाही. त्यामुळे घरगुती सिलिंडरसाठी पन्नास टक्के ‘सबसिडी’ दिली पाहिजे.
- नयन खैरमोडे, गृहिणी, रविवार पेठ
---------------
आता पुन्हा एकदा चुलीच वापरायला लागतील. लाकडे गोळा करायला जावे लागेल. घरगुती गॅस सिलिंडरचा दर हजाराच्या पुढे जाईल, असे वाटले नव्हते. सबसिडीही नसल्यामुळे हा सिलिंडर वापरणे अशक्य वाटत होते. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. कोणत्या शब्दात वाईट प्रतिक्रिया द्यावी हेच सुचत नाही.
- सुनील कदम, रिक्षा व्यावसायिक, आर. के. नगर
----------------
दर वाढल्यामुळे नफा घटलेलाच आहे. सध्या आऊटलेटही वाढले आहेत. स्पर्धा अधिक आहे. कडधान्य, तेल, मटण, मासे, दूध याचेही दर वाढले आहेत. ते वाढतच आहेत. याचा आम्हाला फटका बसत आहे. आता पदार्थ्यांची दरवाढ करणे म्हणजे व्यवसाय कमी करावा लागणार आहे. पुणे-मुंबई सारखे जादा पैसे खर्च करणे आता कोल्हापूरकरांच्या हात बाहेर जात असल्याचे दिसते.
- उज्ज्वल नागेशक, हॉटेल व्यावसायिक