
इतिहास अभ्यासाला पोषक वातावरण निर्मितीत विद्यापीठांचा पुढाकार हवा
87311
...............
इतिहासाबाबतची उपेक्षा दूर करणे आवश्यक
कुमार केतकरः ‘महान शिवाजी’ ग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. ७ : जनमानसातील इतिहासविषयक उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी त्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या चरित्रांचा आधार घ्यायला हवा. इतिहासाच्या अभ्यासासाठी देशात पोषक वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. इतिहास हा मुद्दा आपण अत्यंत काळजीपूर्वक पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर यांनी सोमवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्रातर्फे डॉ. बाळकृष्ण लिखित ‘शिवाजी द ग्रेट’ या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद ‘महान शिवाजी’ या नावाने करण्यात आला आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार ग्रंथाचे संपादक असून वसंत आपटे अनुवादक आहेत. या ग्रंथाचे प्रकाशन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. केतकर बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख उपस्थित, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
केतकर म्हणाले, ‘महान शिवाजी’ हा मूळ ग्रंथ ज्यांनी लिहीला, त्या डॉ. बाळकृष्ण यांचे मूळ मुलतान आहे, जे सध्याच्या पाकिस्तानात आहे. पण, ते पाकिस्तानात आहे म्हणून त्या ठिकाणाचा द्वेष करण्याचे कारण नाही. कारण इतिहासात मुलतान हे बौद्ध, जैन, हिंदू या सर्वच परंपरांचे पवित्र ठिकाण होते. पण इतिहासाच्या ज्ञानाअभावी ते आपल्या द्वेषाला कारण ठरते. तसे होऊ नये. तेथून महाराष्ट्रात येऊन डॉ. बाळकृष्ण महाराष्ट्रवासी झाले, ते कायमचेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते इतके प्रेमात पडले की, त्यांचे अस्सल साधनांनिशी चरित्र लिहीणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले आणि पूर्णत्वास नेले. जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांत इतिहासाबद्दल आस्था निर्माण करीत नाही, तोवर बाळकृष्णांचे योगदान त्यांच्या ध्यानी येणार नाही.’
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांचे विविध संदर्भ साधनांचा वापर करून पहिलेच विस्तृत चरित्र साकारले. महाराजांना ‘शिवाजी द ग्रेट’ असे संबोधून जगज्जेता अलेक्झांडरच्या तोडीचे त्यांचे कार्य असल्याचे प्रथमच निदर्शनास आणून दिले. शंभर वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे नाव घेईल, तो ब्रिटीशांचा शत्रू, असे एक चित्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी थेट प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करवून घेऊन त्यांच्याभोवतीचे हे अप्रसिद्धीचे कडे भेदले.’
डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, ‘डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू संदर्भ सामोरे आणले आहेत. मराठा आरमाराचे जनक, हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा अशी महाराजांविषयीची वर्णने डच कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकामध्येच करण्यात आली आहेत. ती बाळकृष्ण येथे सविस्तर मांडतात. इंग्लिश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा सर्व प्रकारच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाराजांचे मोठेपण अधोरेखित केले आहे.’ वसंत आपटे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले.
...
रयतेच्या हिताचा विचार
केतकर म्हणाले, ‘सार्वभौम स्वराज्याची संकल्पना जागतिकस्तरावर सुद्धा अस्तित्वात नसण्याच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी त्या संकल्पनेवर आधारित स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक आदेशात, निर्णयात रयतेच्या हिताचा, कल्याणाचा विचार असे. महाराजांनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही.
...
राज्यातील सर्व विद्यापीठांना ग्रंथ पाठविणार
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, ‘या वर्षीपासून डॉ. बाळकृष्ण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू करण्यात येईल. ‘महान शिवाजी’ हा ग्रंथ राज्यातील सर्व विद्यापीठांना विशेष दूताकरवी पाठविण्यात येईल.’