
वयोमर्यादा वाढली, स्पर्धा परीक्षा देण्याची संधी मिळाली
वयोमर्यादा वाढली, संधी मिळाली
राज्य सरकारच्या निर्णयाने स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा; सरळसेवेसाठी अर्ज करता येणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः कोरोनाच्या दोन वर्षांमध्ये सरळसेवा आणि अन्य शासकीय सेवेतील पदांच्या भरतीची प्रक्रिया थांबली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याची वयोमर्यादा ओलांडली. या विद्यार्थ्यांकडून सातत्याने वयोमर्यादा वाढविण्याची मागणी झाली. त्यावर विद्यार्थी हित लक्षात घेवून राज्य सरकारने दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढविली आहे. त्याने विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारने शासकीय सेवेतील ७५ हजार जागा भरतीची घोषणा केली आहे. त्यातील काही जागांच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. कोरोनामध्ये स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत. सरळसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा देण्याची एक संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. त्यांच्यासाठी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढविली आहे.३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यासाठी अर्ज करण्याची संधी संबंधित विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
..
‘वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. सरळसेवेच्या विविध पदांसाठी त्यांनी अर्ज करून संधी साधावी.
-दुष्यंत राजेभोसले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक
...
‘कोरोना कालावधीत परीक्षा लांबणीवर पडल्याने आणि भरती प्रक्रिया थांबल्याने माझ्यासारखे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडले. आता वयोमर्यादा वाढल्याने मिळालेली संधी आमच्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे.
-नंदकुमार माने, विद्यार्थी
...
‘राज्य सरकारच्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करते. कोरोनामुळे अडचण निर्माण झाली होती. मात्र, वयोमर्यादा वाढविल्याने शेकडो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
-आरती पाटील, विद्यार्थिनी
....
विद्यार्थ्यांना चांगली संधी
या वाढीव वयोमर्यादेमुळे खुल्या प्रवर्गातील ४० वयापर्यंतच्या, तर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ४५ वयापर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देता येणार आहे. पुढील काही महिन्यांत सरळसेवेतील तलाठी, ग्रामसेवक, आदींसह विविध पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली असल्याचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक जॉर्ज क्रूझ यांनी सांगितले.
...
कोल्हापुरात सुमारे २० हजार विद्यार्थी
गेल्या पाच वर्षांपासून कोल्हापुरात स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला आहे. त्यात अधिकतर विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. सध्या कोल्हापुरातील विविध क्लासेस, अकॅडमीच्या माध्यमातून तसेच सेल्फ स्टडी करून परीक्षा देणाऱ्या युवक- युवतींची संख्या सुमारे २० हजार इतकी आहे. त्यात सांगली, सीमाभागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ३५ टक्के आहे.