
कंजूशी एक्सप्रेस
फोटो- 87724
-
लोगो-
रेल्वे सेवेची ‘कंजुषी’ एक्स्प्रेस ः भाग ५
-
शिळे पोहे, कच्चा वडापाव अन् सांबर नसलेली इडली
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः रेल्वेस्थानकावर कोल्हापूर ते पुणे प्रवासात स्थानकावर कॅन्टीन सुविधा रेल्वे प्रशासनाने पुरवली आहे. दहा बाय बाराच्या गाळ्यात कॅन्टीन आहेत. रेल्वेने ठरवलेल्या दरात खाद्यसेवा दिली जाते. अशी कॅन्टीन सेवा सुरू करण्यासाठी ‘व्यवहार’ घडताच ठराविकांनाच कॅन्टीन कंत्राट मिळते. पुढे गुंतवलेले पैसे काढण्यासाठी काही कॅन्टीन चालक शिळे पोहे, कच्चा वडापाव, पाण्यासारखा चहा अशा निकृष्ट दर्जाची सेवा देत प्रवाशांना लुटत असल्याचे दिसते.
मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाकडून कॅन्टीनसाठी निविदा निघते. पुणे कार्यालयाकडून अंमलबजावणी होते. बहुतेक वेळा रेल्वेशी संबधित घटकच आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या नावे निविदेचा लाभ उठवतात. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर ‘त्या’च्या अपेक्षा पूर्ण करताच ठराविकांना कॅन्टीनचा ठेका मिळतो. यात बहुतांश ठेका परप्रांतीय व्यक्तींना मिळाला आहे. मुख्य ठेकेदार मुंबईत किंवा पुण्यात बसतो. ज्या गावातील रेल्वेस्थानकावर कॅन्टीन आहे, तेथील स्थानिक हॉटेलवाल्याला किंवा स्वतःच्या जवळच्या व्यक्तीना कॅन्टीनमध्ये खाद्यपदार्थ बनविणे व विक्री करण्यासाठी कमिशनवर नियुक्त करतो. यात रेल्वेला किमान एका गाळ्याला दरमहा ६० हजार ते एक लाख २० हजारांचे भाडे भरावे लागते. खाद्यपदार्थ बनविण्यासाठीची गुंतवणूक, कामगारांचे पगार असा महिन्याचा खर्च किमान दोन ते चार लाखांपर्यंत कॅन्टीन खर्च येतो.
असा घातलेला खर्च वसुलीसाठी दिवसाला किमान २० ते ३० हजार रुपयांची उलाढाल कॅन्टीनमध्ये व्हावी लागते. तेवढी उलाढाल न झाल्यास तोटा होतो. तो टाळून नफा कमावण्यासाठी पदार्थ बनवताना बहुतेक गोष्टीत कंजुषी केली जाते.
वडापाव तळण्यास तेल हलक्या दर्जाचे वापरणे, बटाटा भाजीला फोडणी कमी देणे, लहान आकाराचा वडापाव, पोह्यासाठी फोडणी देताना शेंगदाणे नाही, हळदीत रंगवलेले पोहे, मिरचीचा तुकडा, मीठ कमी, इडली सांबारऐवजी फक्त इडली चटणी असते. जेवणात चपात्या कच्च्या, बहुतेक पदार्थ करताना फोडणीसाठी जिरे, मोहरी, कोथिंबीर, शेंगदाणे वापरात कंजुषी केली जाते. असे सकाळचे पदार्थ सायंकाळपर्यंत चांगल्या पाकिटातून विकले जातात. प्रवासी घाई गडबडीत पॅकेट घेतात, पैसे देतात, निघून जातात, तक्रार करण्यास संधीच नाही. कोल्हापूर-पुणे मार्गावर मिरज, सांगली, कऱ्हाड, सातारा अशा थांब्यावर थोड्या फरकाने हा अनुभव प्रवासी सांगतात; तर काही ठिकाणी चांगले पदार्थ जरूर मिळतात.
चौकट
प्रवाशांना करता येते तक्रार
रेल्वे कॅन्टीनमधून निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची तक्रार रेल्वेस्थानकावर प्रबंधक कार्यालयातील नोंदवहीत करता येते. पदार्थ कोणत्या गावातील रेल्वे कॅन्टीनमधून किती तारखेला, किती वाजता घेतला, पैसे किती दिले, पदार्थ निकृष्ट दर्जाचा होता असे तक्रादारास नोंदविता येते. त्यात स्वतःचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक द्यावा. त्यानंतर रेल्वेचे वरिष्ठ तक्रारीची दखल घेत चौकशी करतात. गरजेनुसार कारवाई करतात. त्याची माहिती तक्रारदार प्रवाशाला दिली जाते.